
सावर्डे : ज्ञानार्जन बरोबरच कौटुंबिक जाणीव असणारा विद्यार्थीच भविष्यात यशस्वी होतो. संस्थेच्या वतीने दिलेल्या सर्व शैक्षणिक सोईंचा योग्य वापर करून संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. पालक, शिक्षक व विद्यार्थी यांचा सुसंवाद होणे आवश्यक आहे या संवादातूनच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो असे प्रतिपादन विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांनी केले.
सह्याद्री शिक्षण संस्था संचालित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नुकतीच पालक सभा संपन्न झाली या सभेला 749 पालक उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक व स्वागत अमित साळवी यांनी केले. पालक शिक्षक व विद्यार्थी यांच्या संघटित प्रयत्नाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य आहे याची माहिती प्रस्ताविकातून अशोक शितोळे यांनी दिली. विद्यालयाचे पर्यवेक्षक उध्दव तोडकर यांनी पालकांची भूमिका व विविध उपक्रम याविषयी विवेचन केले.,शालेय परीक्षा व त्यांचे नियोजन,ज्यादा सराव परीक्षा बाबत उपमुख्याध्यापक विजय चव्हाण यांनी सविस्तर माहिती दिली. विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यालयाने प्राप्त केलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमातील यश याबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा थोडक्यात आढावा घेतला व विद्यार्थी सुसंस्कृत घडण्यासाठी परिसरातील अनेक घटक कसे उपयुक्त असतात याची उदाहरणासह माहिती देऊन पालकांनी सजग राहण्याचे आवाहन केले. विद्यालयात सुरू असणारे विविध उपक्रम व विद्यार्थ्यांचे गुणवत्ता याबाबत पालकांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी एन एम एम एस परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा,नवोदय परीक्षा, इयत्ता दहावीतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी, विज्ञान प्रदर्शनातील यशस्वी विद्यार्थी यांचा गौरव करण्यात आला.
या पालक सभेत पालक शिक्षक संघ व शाळा व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली. पालक सभा यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.शेवटी सुधीर कदम यांच्या आभार प्रदर्शनाने पालक सभेची सांगता झाली. पालकांना मार्गदर्शन करताना प्राचार्य राजेंद्र वारे व पालक व विद्यार्थ्यांचा सन्मान करताना मान्यवर