
मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला काही तास शिल्लक राहिले आहेत. प्रशासनाने आज दुसऱ्या दिवशीही मालवण शहरात रंगीत तालीम घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा ताफा ज्या मार्गावरून जाणार आहे त्या मार्गावर आज प्रशासनाने रंगीत तालीम घेतली. बोर्डिंग मैदान, सागरी महामार्ग, कोळंब पूल, मालवण एसटी स्टॅण्ड, भरड, तारकर्ली, फोवकांडा पिंपळ, राजकोट, या मार्गावर दुपारी चार ते साडे सहा या वेळात पोलीसांनी गाड्यांच्या ताफ्याची रंगीत तालीम घेतली. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात होता. त्या मार्गांवरील जोडल्या जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक थांबविण्यात आल्याने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.
यावर्षीचा नौसेना दिन चारा डिसेंबर रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर आज सुरक्षा यंत्रणेने रंगीत तालीम घेतली. पंतप्रधांनाचे हेलिकॉप्टर बोर्डिंग मैदानावर उतरल्या पासून निघे पर्यंत ही रंगीत तालीम घेण्यात आली. हेलिकॉप्टरने उतरल्यानंतर त्यांच्या गाड्यांचा ताफा थेट राजकोट किल्ला येथे रवाना झाला, त्यानंतर पुन्हा ताफा माघारी फिरून सागरी महामार्गावरून तारकर्लीच्या दिशेने रवाना झाला. यात विविध प्रकारची सुरक्षा यंत्रणा ताफ्यात होती. यावेळी कोळंब मालवण, देऊळवाडा मालवण, मालवण तारकर्ली हे प्रमुख तिन्ही मार्ग बंद करून ठेवण्यात आले होते. नागरिकांनी पोलीसांना सहकार्य करत गाड्या थांबून वाहनांचा ताफा जाणारा मार्ग खूला करून ठेवला होता.