निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतमोजणीची रंगीत तालिम

Edited by:
Published on: June 03, 2024 11:34 AM
views 185  views

रत्नागिरी : येथील मिरजोळे एमआयडीसीतील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात उद्या मतमोजणी होणार आहे. त्याची रंगीत तालिम निवडणूक निरीक्षक भूवनेशप्रताप सिंह व रेवती यांच्या उपस्थितीत आज झाली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून सर्वच अधिकारी, कर्मचारी यांनी चांगले काम केले आहे. उद्याचा मतमोजणीचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे, निश्चितच त्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे आहे. दिलेली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडाल, त्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो, अशा शब्दात निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, सिंधुदूर्गचे अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, सिंधुदूर्गचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे आदी उपस्थित होते.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गायकवाड यांनी संगणकीय सादरीकरण करुन अत्यंत सविस्तरपणे उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना मतमोजणीचे प्रशिक्षण दिले. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सिंह म्हणाले, तुम्हा सर्वांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांनी चांगले काम केले आहे. मतमोजणी संदर्भात काही शंका असेल, काही अडचण असेल तर, ती जरूर विचारावी. त्याचे निरसन केले जाईल. तुम्ही सर्वजण निश्चितपणे चांगले काम करत आहात आणि उद्यादेखील करणार आहात. त्याची दखल घेतली जाईल, असेही ते म्हणाले. पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.