
सावंतवाडी : देवकार्य, लग्न समारंभ, सण उत्सवात, मानपान, गाऱ्हाण्यापासून कोकणात जेवणात सर्रास वापरले जाणारे श्रीफळ चाळीशी पार झाले आहे. महागाईचे चटके सर्व सामान्य माणसाला बसत असताना नारळाचे दरही वाढलेत. हवामान बदलाचा परिणाम फळबागांना बसत असून नारळाच्या झाडाला फटका बसला आहे. त्यामुळे नारळ उत्पादन घटले आहे. नारळाचे प्रतिनग दर २० ते ५० रूपये झाल्याने ग्राहकांच्या खीशाच खोबरं झालं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळाचे दर चाळीशी पार पोहचले असून हा दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पोहचला आहे. त्यामुळे रोजच्या जेवणातील नारळ तोलून मापून वापरावा लागत आहे. बहुदा हा वापरही काहीसा कमी होताना दिसत आहे. बाजारपेठेतील नारळ विक्रेत्यांची संख्याही कमी झाली आहे. नारळ उत्पादनात कमालीची झालेली घट तसेच नारळाला असलेली मागणी पाहता नारळाचे दर वाढले गेल्याचे बागायतदाराकडून सांगण्यात येत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता या ठिकाणी बागायदाराकडून मोठ्या प्रमाणात नारळाची लागवड करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गेली कित्येक वर्ष मोठ्या प्रमाणात याठिकाणी नारळाचे उत्पादन घेतले जाते. नारळाच्या उत्पादनासोबतच या ठिकाणी सुपारी,काजू, आंबा आदी उत्पादनातून येथील शेतकरी बागायतदार आपली रोजीरोटी भागवत आहे. गेल्या काही वर्षांत नारळाचे दर कमी जास्त होताना पाहायला मिळत आहेत. निसर्ग चक्र बदलत आहे. बदलते हवामान,असंतुलित पाऊस आणि कीड रोगाचा सातत्याने होणारा प्रादुर्भाव लक्षात घेता गेल्या काहीत वर्षात नारळाचे उत्पादन निम्यावर येऊन ठेपले आहे. बदलते वातावरणच नारळाच्या उत्पादनाला मारक ठरले आहे. एकुणच याचा परिणाम नारळाच्या दरवावर दिसून आला आहे असे बागायतदारांचे मत आहे. गतवर्षी साधारण दहा रुपयाला मिळणारा नारळ आता २५ ते ३० रुपयापर्यंत बाजारपेठेमध्ये विकला जात आहे. तर त्यापेक्षा मोठा नारळ हा ३५ ते ४० रुपयापर्यंत पोहचला आहे. थेट बागायतदाराकडून नारळ घाऊक विकत घेतल्यास हा दर काहीसा कमी मिळत असला तरी बाजारपेठेत असलेले दर मात्र सर्व सामान्यांच्या खिशाला परवडणारे नाही. त्यामुळे सद्या नारळ मोठ्या प्रमाणात भाव खातांना दिसत आहे. नारळाचे दर यावर्षी मध्यंतरीच्या काळात वीस रुपयांपर्यंत स्थिरावले होते. परंतु गणेश चतुर्थी नंतर नारळाचे दर वाढतानाच पाहायला मिळत आहे. जत्रोत्सवाचा हंगामात हे दर ४० रुपयापर्यंत पोहचले असून जत्रोत्सवाला मोठ्या प्रमाणात ओटी भरण्यासाठी नारळाची मागणी असते.
जत्रोत्सवात नारळ, केळी, फुले आदी व्यापार व्यवसाय करणारे थेट बागायतदारांकडून मोठ्या प्रमाणात नारळाची उचल करतात .याशिवाय जिल्ह्यातील व नजीकच्या गोवा राज्यातील हॉटेल व्यवसायिक यांच्याकडूनही बागायतदारांकडे नारळासाठी मोठी मागणी असते. त्यामुळे बागातदारांकडेच नारळ उपलब्ध नसल्याने नारळाचे दर आपसुकच वधारले आहेत. एकीकडे कडधान्य, खाद्यतेल आदी जेवणातील वस्तूंचे दर आधीच गगनाला भिडले असताना आता जेवणाची चव वाढविणारा महत्त्वाचा घटक असलेला नारळाचा दरही आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्यांच बजेट कोलमडले आहे. वातावरणातील बदलामुळे आणि रोग प्रादुर्भावामुळे नारळ उत्पादनातील ही घट अशीच कायम राहिल्यास नारळाचा दर पुढील काळात निश्चितच सर्वसामान्यांना घाम फोडेल अन् नारळ पाणी पाजायची वेळ आणेल यात शंका नसल्याचे बागायतदारांकडून बोलले जात आहे.