नगरोत्थान अंतर्गत सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा भूमिपूजन सोहळा

मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार भूमिपूजन
Edited by: विनायक गांवस
Published on: February 08, 2024 14:24 PM
views 289  views

सावंतवाडी : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) अंतर्गत सावंतवाडी शहर पाणीपुरवठा योजना सुधारीत करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा शनिवार १० वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे असणार आहेत. 


या कार्यक्रमात पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आ. निरंजन डावखरे, आ. अनिकेत तटकरे, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. वैभव नाईक, आ. नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत जिमखाना मैदान, सावंतवाडी येथे संपन्न होणार आहे. 


या योजनेसाठी महाराष्ट्र शासन, नगरविकास विभागाद्वारे 56.17 कोटी रक्कमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पाळणेकोंड धरणाची सुधारणा करणे, नवीन जलशुध्दीकरण केंद्र बांधणे, शहरातील झिरंग व गरड भागामध्ये दोन उंच सलोह पाण्याच्या टाक्यांची उभारणी करणे, पाळणेकोंड धरण ते नवीन पाण्याच्या टाकीपर्यंत गुरुत्ववाहिनी टाकणे तसेच शहरातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्था सुधारणे इ. कामे करण्यात येणार आहेत. सावंतवाडी शहरातील पाणीपुरवठया संबंधी ही एक महत्वाची योजना असून या योजनेच्या भूमीपूजन सोहळयात नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याधिकारी सागर साळुंखे यानी केले आहे.