
सिंधुदुर्गनगरी : ओरोस-गावडेवाडी (ता. कुडाळ) येथील श्री देवी भवानी मंदिराचा भव्य शिखर कलशारोहण व देवीची मूर्ती पुनःप्रतिष्ठापना सोहळा २५ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२५ दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून त्यांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री कुलस्वामिनी भवानी देवी उत्सव मंडळ, उत्कर्ष भजन मंडळ गावडेवाडी व सर्व तावडे परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे
मंदिर परिसरात चार दिवस विविध धार्मिक विधी, पूजा-अर्चा, कलशयात्रा, होम-हवन, ग्रहशांती, मंडप प्रवेश, जलाधिवास, शिखरारोहण आदी कार्यक्रमांची नित्यनेमाने मालिका पार पडणार आहे. भक्तांसाठी दर्शन व पूजाविधीची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
२५ नोव्हेंबर रोजी सोहळ्याची सुरुवात होणार असून देवी भवानी मातेची मूर्तीची सवाद्य मिरवणूक व सभामंडप शुद्धीची विधी पार पडणार आहे. २६ नोव्हेंबर, कलशयात्रा, मंडप प्रवेश, गणेशपूजन, मंडप देवता स्थापना, जलाधिवास, ग्रहशांती व विविध पूजा-अर्चा संपन्न होणार आहेत. २७ नोव्हेंबर रोजी देवतांची स्थापना, प्रसाद स्थापत्य होमहवन आदी आध्यात्मिक विधी पार पडतील. तर २८ नोव्हेंबर हा सोहळ्याचा मुख्य दिवस असून सकाळी संकल्प, देवतापूजन, शिखरारोहण, तसेच सकाळी ११ वाजता देवीची मूर्ती पुनःप्रतिष्ठापना होणार आहे. त्यानंतर होम, हवन, तत्त्व होम, गुणहोम, बलिदान, महापूजा, आरती व महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
तरी भक्तांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.










