LIVE UPDATES

स्वच्छता ग्रिन लिफ रेटिंग

सिंधुदुर्ग पर्यटन वाढीसाठी ठरणार महत्वाचं
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 02, 2025 14:03 PM
views 80  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी निवास यांचे स्वच्छता ग्रिन लिफ रेटिंग अंतर्गत गुणांकन होऊन 1, 3 व 5 लिफ नामांकन देण्यात येणार आहे. या रेंटिंगच्या माध्यमातुन देशी- विदेशी पर्यटक येथिल हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी निवास आस्थापनेना भेट देतील.  त्याचा फायदा जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय वाढण्याकरीता होऊ शकतो. ग्रिन लिफ रेंटिंग करीता लागणारा स्वंयमुल्यांकन फॉर्म जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. तरी जिल्ह्यातील सर्व हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी निवास व्यवसायिकांनी या कार्यक्रमांत सहभाग नोंदवावा. असे आवाहन अनिल पाटील, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे. 

स्वच्छता ग्रिन लिफ रेटिंग कार्यक्रमांचे आयोजन करण्याकरीता दिनांक 30 जुन 2025 रोजी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत एका बैठकिचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रविंद्र खेबुडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, विशाल तनपुरे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, प्रातांधिकारी सर्व, गटविकास अधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते. 

पाणी पुरवठा स्वच्छता मंत्रालय व पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत जिल्ह्यातील हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी निवास यांचे घनकचरा व्यवस्थापन, मैलागाळ व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन या तीन निकषावर गुणांकण होणार आहे. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत 80 गुण, मैला गाळ व्यवस्थापन करीता 80 गुण तर सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत 40 गुण असे 200 गुण निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये 100 ते 130 गुण ज्या आस्थापनेस मिळणार आहेत त्याना 1 लिफ 130 ते 180 गुण मिळविणा-या आस्थापनेस 3 लिफ तर 180 ते 200 गुण प्राप्त करना-या आस्थापनेस 5 लिफ गुणाकण प्राप्त होणार आहे. मात्र 1 लिफ गुणांकण प्राप्त करण्याकरीता मैलागाळ व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत किमान 40 गुण तर सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत किमान 20 गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. 3 लिफ गुणांकण प्राप्त करण्याकरीता मैलागाळ व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत किमान 50 गुण तर सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत किमान 20 गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. तर 5 लिफ गुणांकण प्राप्त करण्याकरीता मैलागाळ व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत किमान 60 गुण तर सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत किमान 30 गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. 

हॉटेल आस्थापना यांनी आपले स्वंयमुल्याकण करुन अर्ज पंचायत समिती येथे दिनांक 30 जुलै 2025 पर्यत सादर करावयाचा आहे. स्वच्छता ग्रिन लिफ रेटिंग अतर्गत तालुकास्तरावर पडताळणी समितीमध्ये उपविभागिय दंडाधिकारी याच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी/ विस्तार अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पर्यटन किंवा उद्योग क्षेत्रातील, पाणी पुरवठा विभाग (तांत्रिक बांबी पाहणारे) अधिकारी / कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. तर जिल्हास्तरावर  जिल्हाधिकारी  यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, मा. प्रकल्प  संचालक, जल जीवन मिशन तथा जिल्हा समन्वयक (स्वच्छ भारत मिशन) सदस्य सचिव, पर्यटन विभाग/MTDC जिल्हा प्रतिनिधी सदस्य, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. प) सद्स्य, जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने पर्यटन / हॉटेल उद्योगातील प्रतिनिधी सदस्य याची समिती स्थापन करण्यात येऊन जिल्ह्यातील हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी निवास यांची तपासणी करणार आहे. 

हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी निवास या आस्थापनाना ग्रिन लिफ रेटिंग अंतर्गत मिळणारे 1 ते 5 असे मिळणारे लिफ रेटिंग जिल्ह्यातील पर्यटना करीता पुरक ठरणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळा, न्याहरी निवास आस्थापना यांनी ग्रिन लिफ रेंटिंग करीता लागणारा स्वंयमुल्याकन फॉर्म जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे संकेतस्थळावरुन घेऊन पंचायत समिती येथे सादर करावा  असे आवाहन अनिल पाटील, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.