
दोडामार्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत "सेवा पंधरवडा" म्हणून विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून येथील ग्रामीण रुग्णालयात भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते व नगरपंचायतने एकत्र येऊन स्वच्छता मोहिम राबवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सेवा पंधरवडा या उपक्रमाची सुरुवात रुग्णालयाची स्वच्छता करून करण्यात आली. या उपक्रमात रुग्णालयाच्या आवारात व परिसरात स्वच्छता केली. रुग्णालयातील रस्ते, प्रवेशद्वार तसेच फुलबागा व झाडाझुडपांची सफाई करण्यात आली. हा उपक्रम सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आणि जनतेला स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी राबविण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष दीपक गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, शहराध्यक्ष राजेश फुलारी, संयोजक संतोष नानचे, उपतालुकाध्यक्ष आनंद तळणकर, सुनील गवस, माजी शहराध्यक्ष समीर रेडकर यांसह पदाधिकारी, संध्या प्रसादी, क्रांती जाधव, आदी नगरसेवक तसेच आकांक्षा शेटकर, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या 'स्वच्छ भारत अभियान' या संकल्पनेला पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.