
मालवण : शहरातील धुरीवाडा साईमंदिर परिसरातील रस्त्यांच्या दुतर्फा साचलेला कचरा आणि सांडपाण्याच्या गंभीर समस्येची दखल घेत मालवण पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता सभापती पूनम चव्हाण यांनी प्रशासकीय ताफ्यासह घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी केवळ पाहणीच केली नाही, तर तातडीने कर्मचाऱ्यांकडून परिसर स्वच्छ करून घेत नागरिकांना दिलासा दिला.
सभापती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पूनम चव्हाण यांनी प्रत्यक्ष मैदानावर उतरून लोकहिताच्या कामांना सुरुवात केली आहे. धुरीवाडा येथे कचऱ्याचे ढीग आणि सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याची गांभीर्याने दखल घेत त्यांनी स्थानिक नगरसेवक ललित चव्हाण, नगरसेविका अनिता गिरकर आणि स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांसह परिसराचा दौरा केला.
अनेक नागरिक आपले सांडपाणी थेट उघड्या गटारांमध्ये सोडत असल्याचे यावेळी निदर्शनास आले. या प्रकारामुळे परिसरात दुर्गंधी पसरून डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. याची गंभीर दखल घेत सभापती चव्हाण यांनी पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांना नियम मोडणाऱ्या नागरिकांना तात्काळ नोटीस बजावण्यात याव्यात असे कडक आदेश दिले आहेत.
शहरात घंटागाडीची सोय असतानाही काही नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा फेकत असल्याचे दिसून आले आहे. यावर उपाय म्हणून चव्हाण यांनी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात कचरा संकलन करणाऱ्या कामगारांनी प्रत्येक घरात जाऊन कचरा घेतला किंवा नाही, याची खात्री करण्यासाठी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घ्याव्यात. या मोहिमेनंतरही जर कोणी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना आढळले, तर त्यांच्यावर पालिकेमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
शहराची स्वच्छता राखणे ही केवळ पालिकेचीच नाही, तर नागरिकांचीही जबाबदारी आहे. घंटागाडीचा वापर करा आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करा असे आवाहन आरोग्य व स्वच्छता विभागाच्या सभापती सौ. चव्हाण यांनी केले आहे.
या धडक मोहिमेमुळे धुरीवाडा परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे बेशिस्त कचरा टाकणाऱ्यांवर वचक बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.










