सिंधुदुर्गातील सर्व मंदिरामध्ये 20 जानेवारीला स्वच्छता अभियान !

Edited by: देवयानी वरसकर
Published on: January 16, 2024 09:54 AM
views 67  views

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या सुचना नुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात संपूर्ण स्वच्छता (Deep Cleaning) मोहिम दिनांक 22 जानेवारी 2024 पर्यत राबविण्यात येणार आहे. तसेच  जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे एकाचवेळी दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9.00 ते 11.00 या कालावधीत स्वच्छ करण्यात येणार आहेत अशी माहिती  विनायक ठाकुर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी दिली आहे. 

ग्रामीण भागातील संपूर्ण स्वच्छता (Deep Cleaning) मोहिम राबविणेबाबत मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांचेकडुन सूचना प्राप्त झालेल्या आहेत.  या संपूर्ण स्वच्छता (Deep Cleaning) मोहिमेमध्ये स्वच्छतेची व्यापक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी ग्रामीण भागातील सर्व मनुष्यबळ व यंत्रणा यांचा सहभाग घेवून मोठया प्रमाणात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये रस्ते स्वच्छ धूळमुक्त करणे, गल्लीबोळातील कचरा काढणे, गटारे, नाल्यांचे प्रवाह तसेच नाल्यांचा परिसर स्वच्छ करणे, सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे, अनाधिकृत फलक, भित्तीपत्रके, बेवारस वाहने हटविणे, सार्वजनिक भिंती स्वच्छ करुन त्यावर स्वच्छताविषयक कलात्मक संदेश टाकणे, तसेच ग्रामणी भागातील सार्वजनिक ठिकाणांवर दर्शनी भागामध्ये जनजागृतीपर संदेश माहिती रेखाटून त्या सुंदर करणे अशा कार्यवाहीचा समावेश करण्यात  करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमांचे आयोजन आपल्या कार्यक्षेत्रात दिनांक 22/01/2024 पर्यत करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व मंदिरामध्ये स्वच्छता अभियान व रोशणाई करण्याबाबत मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांचेकडुन सूचना प्राप्त असून त्या अनुषंगाने जिल्ह्यातील पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद कार्यक्षेत्रातील सर्व मंदिरे व आसपासच्या परिसरातील स्वच्छता मोहिम कार्यक्रमांचे आयोजन एकाच दिवशी दिनांक 20/01/2024 रोजी सकाळी 9.00 ते 11.00 या वेळेत करण्यात आले आहे.  याबाबत तालुकास्तरावर जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी सुचना दिल्या आहेत. तरी जिल्हावासियांनी या कार्यक्रमांत सहभाग घ्यावा असे आवाहन श्री विनायक ठाकुर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी केले आहे.