
देवगड : भाजपाच्या सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किल्ले विजयदुर्ग परिसरात पडेल मंडल भाजपतर्फे भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमामुळे जागतिक वारसा स्थळ असलेला विजयदुर्ग किल्ला अक्षरशः चकाचक झाला.
पडेल मंडल अध्यक्ष महेश (बंड्या) नारकर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २०० कार्यकर्ते व ४० गवत कापणी मशीनच्या सहाय्याने संपूर्ण किल्ला परिसर स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेत शालेय विद्यार्थी आणि महिलांचा सहभाग विशेषत्वाने लक्षवेधी ठरला.
अभियानाची सुरुवात किल्ल्यावरील भवानी देवीला गाऱ्हाणे घालून झाली. त्यानंतर कार्यकर्त्यांचे गट पाडून किल्ल्याचा आतील व बाहेरील परिसर नीटनेटका करण्यात आला. “जागतिक वारसा ठरलेला हा किल्ला स्वच्छ ठेवणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आणि कर्तव्य आहे,” असा संदेश यावेळी उपस्थितांनी दिला.
या स्वच्छता मोहिमेत जिल्हा पदाधिकारी बाळा खडपे, रवी पाळेकर, डॉ. अमोल तेली, अरिफ बगदादी, संजय बोंबडी, पडेल सरपंच भूषण पोकळे, भूषण बोडस, अंकुश ठुकरूळ, संजना आळवे, विजयदुर्ग सरपंच रियाज काजी, पडेल सरचिटणीस रवींद्र तिर्लॉटकर, रामकृष्ण राणे, माजी पंचायत समिती सदस्या शोभा कदम, प्रदीप साखरकर, आनंद देवरुखकर, महेश बीडये, विनोद सुके यांसह स्थानिक नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
छत्रपती शिवरायांचा ऐतिहासिक वारसा जपण्याचा संकल्प घेऊन पार पडलेल्या या स्वच्छता मोहिमेमुळे विजयदुर्ग किल्ला नव्या रुपात उजळून निघाला.










