सामाजिक बांधिलकीकडून स्टॅन्ड परिसरात स्वच्छता अभियान

Edited by: विनायक गांवस
Published on: July 11, 2024 05:41 AM
views 114  views

सावंतवाडी : सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून बुधवारी सावंतवाडी-वेंगुर्ला स्टॅन्ड च्या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याठिकाणी दुर्गंधीच साम्राज्य निर्माण झाले होते. याबाबत एसटी प्रशासनाच लक्ष त्यांनी वेधल होत. दरम्यान, वेंगुर्ला बसस्टँडवरील प्रसाधनगृह संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने दुरुस्ती करून लवकरात लवकर सुरू करणार असल्याची माहिती  सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठाने दिली आहे.  

या प्रसाधनगृहाच्या परिसरात वाढलेली झाडे-झुडपे, कुजलेल्या भाज्या, फ्रुट, काचेच्या फुटलेल्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या तसेच चिखलाच साम्राज्य निर्माण झाले होते. सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी स्वतः मैदानात उतरून हा परिसर स्वच्छ केला. तसेच कित्येक दिवस बंद असलेले प्रसाधनगृह तत्काळ सुरू करण्यासाठी सामाजिक बांधिलकीने ठोस पावलं उचलली आहेत. ऐन पावसामध्ये बंद असलेल्या प्रसाधनगृहाचा विपरीत परिणाम बस स्टॅन्ड वरील प्रवासी महिला, विद्यार्थी, रूग्ण, ज्येष्ठ नागरिक व त्या परिसरातील व्यावसायिकांवर होत आहे. प्रसाधनगृह बंद असल्याकारणाने नाईलाजास्तव प्रसाधनगृहा बाहेर उघड्यावरच लघुशंका करण्याची वेळ येत आहे. या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून या परिसराची साफसफाई करून प्रसाधनगृह लवकरात लवकर सुरू व्हाव यासाठी पुढाकार घेऊन केलेल्या कामाची पोच  आगार व्यवस्थापक व सावंतवाडी मुख्याधिकारी यांना सुपूर्द केली आहे.

 प्रसाधनगृहामध्ये ज्या त्रुटी व दुरुस्ती आहेत त्या संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने दुरुस्ती करून प्रसाधनगृह लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच प्रसाधनगृह सुरू झाल्यानंतर प्रसाधनगृह नेहमीच स्वच्छ व कायम स्वरूपी सुरू राहावं  यासाठी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून एका स्वच्छता दूतची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याला दर महा मानधन देण्यात येणार आहे. त्यासाठी येथिल व्यावसायिक मनवेल डिसोजा यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. सामाजिक बांधिलकीचा हा स्वच्छता अभियान उपक्रम यशस्वी होण्यासाठी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर तसेच सावंतवाडी नगर परिषदेचे स्वच्छता अधिकारी दीपक म्हापसेकर व सफाई कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमामध्ये सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे, सचिव समीरा खलील, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, रवी जाधव, हेलन निब्रे, रूपा मुद्राळे,  सुजय सावंत व शामराव हळदणकर यांनी सहभाग घेतला होता .