
सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सुसज्ज अतिदक्षता विभाग (I.C.U.) आणि ट्रामा केअर युनिट कार्यान्वित केल्याचा दावा आरोग्य विभागाच्यावतीने कोल्हापूर सर्क्रीट बेंच समोर करण्यात आला. यासंदर्भात एका आठवड्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश न्यायमूर्ती जम.एस.कर्णीक आणि न्यायमूर्ती शर्मीला देशमुख यांनी दिलेत. आरोग्याच्या गंभीर प्रश्नासंदर्भात राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी याबाबत लक्ष घालण्याचे निर्देश न्यायमूर्तींनी दिले.
अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग या संस्थेच्यावतीने २०१३ ला जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यांच्या वतीने ॲड. महेश राऊळ, महेश रावडे यांनी जोरदार युक्तिवाद केला. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून सर्वसामान्य, गोरगरीब रुग्णांना, जनतेला मुलभूत वैद्यकीय सुविधा देखील मिळत नाहीत. गेल्या चार महिन्यात 745 रुग्ण गोवा-बांबोळी येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. 108 रुग्णवाहिकेने दाखल केलेल्या रुग्णांचा हा आकडा आहे. त्या शिवाय अन्य खासगी वाहनाने गेलेले रुग्ण विचारात घेता हा आकडा आणखी मोठा होईल, असा युक्तिवाद मांडला.
अँड.राऊळ म्हणाले, आरोग्य विभाग आय.सी.यु. कार्यान्वित केल्याचा दावा करते. मात्र, तिथे तज्ञ वैद्यकीय अधिका-यांची कमतरता आहे. मुलभूत वैद्यकीय सुविधा नसल्यामुळेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून रुग्ण गोवा बांबोळी येथे पाठवले जात आहेत. कारिवडे येथील परशुराम पोखरे या तरुणाचा 3 ऑगस्ट 2025 ला अपघात झाला. त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार मिळू शकले नाहीत. वेळेवर रुग्णवाहिका मिळू शकली. उपचारा अभावी बांबोळीला जात असतानाच त्याचा मृत्यू झाला ही बाब अतिशय गंभीर आहे. या सामान्य जनतेला न्याय मिळणार कधी ? असा प्रश्न अँड. राऊळ यांनी उपस्थित केला.
सरकारी वकिल ॲड. नेहा भिडे यांनी यासंदर्भात म्हणणे मांडण्यासाठी एका आठवड्याचा अवधी मागितला. सरकारी वकिलांनी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे आय.सी.यु. आणि ट्रामा केअर युनिट कार्यान्वित झाल्याचे सांगितले. याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करणार असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. यासंदर्भात न्यायमूर्तींनी सुनिवणीसाठी पुढील तारीख 25 सप्टेंबर ठेवली असून त्यावेळी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील सुनावणीस हजर होते.










