न्यायमूर्ती भुषण गवई यांच्या हस्ते दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचा कोनशीला समारंभ कार्यक्रम

महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड.संग्राम देसाई यांची माहिती
Edited by: भरत केसरकर
Published on: February 22, 2024 14:38 PM
views 107  views

कुडाळ : कुडाळ आणि देवगड येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालय नवीन इमारतींचा कोनशिला समारंभ शनिवार दि. २४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. देवगड येथे सकाळी १०.३० वाजता तर कुडाळ येथे सायंकाळी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. सर्वोच्च न्यायालय (नवी दिल्ली)चे न्यायमूर्ती भुषण गवई यांच्या हस्ते हा कोनशिला कार्यक्रम होणार आहे,  अशी माहीती महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड.संग्राम देसाई यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत दिली.

       कुडाळ न्यायालयीन वकिल चेंबरमध्ये गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत अॅड.संग्राम देसाई बोलत होते. यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड.विवेक मांडकुलकर, जिल्हा सदस्य अॅड.अमोल सामंत, कुडाळ वकिल संघ अध्यक्ष अॅड.राजश्री नाईक, उपाध्यक्ष अॅड.अविनाश परब, सचिव अॅड.महेश शिंपूकडे, खजिनदार अॅड.अमित सावंत, महिला उपाध्यक्षा अॅड.प्रज्ञा पाटील, अॅड.राजीव बिले, अॅड.अमोल मालवणकर, अॅड.अवधूत भणगे, अॅड.निलांगी सावंत-रांगणेकर, अॅड.राजीव कुडाळकर, अॅड.हितेश कुडाळकर, अॅड. समीर कुलकर्णी, अॅड.मळगावकर, अॅड.तुषार भणगे, अॅड.गौरव पडते, अॅड.अमित मरमलकर, अॅड.रूपेश देसाई, अॅड.भाऊराव परब, अॅड.निकिता सामंत, अॅड.तेजश्री मेस्त्री, अॅड.रूपाली कदम, अॅड. कविता खोचरे, अॅड.संध्या देसाई, अॅड. श्रद्धा तेंडोलकर आदींसह वकिल उपस्थित होते.

     या कार्यक्रमाला मंत्री नारायण राणे, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा विधि व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उच्च न्यायालय (मुंबई)चे न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आणि उच्च न्यायालय (मुंबई)चे न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी सिंधुदुर्गचे जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष परीमल पांडे उपस्थित राहणार आहेत तसेच या समारंभाला शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत, कुडाळ - मालवणचे आमदार वैभव नाईक, कणकवली-देवगड-वैभववाडीचे आमदार नितेश राणे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत. ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्री.तावडे आणि मुंबई उच्च न्यायालय येथे रजिस्टार म्हणून कार्यरत असलेले आर.एन.जोशी यावेळी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम शासनाचा नसून मुंबई उच्च न्यायालयाच्या राजशिष्टाचार विभागाने या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दोन सुपुत्र न्यायाधीश बनून उच्च पदावर कार्यरत आहेत, असे मुंबई उच्च न्यायालयात रजिस्टार म्हणून कार्यरत असलेले लाडशेठ बिले आणि नागपूर येथे रजिस्टार म्हणून कार्यरत असलेले श्री.सातावळेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे, असे अॅड.देसाई यांनी सांगितले.

   न्यायालयाच्या इतिहासात हा पहिल्यांदाच अशाप्रकारचा मोठा कार्यक्रम होत आहेत. राजकीय कार्यक्रम आणि हा कार्यक्रम यात मोठा फरक आहे. केवळ हा न्यायालयीन कार्यक्रम नसून, सर्वसामान्य जनतेने यावेळी उपस्थित राहावे. असे आवाहन अॅड.देसाई यांनी यावेळी केले. कुडाळ येथील तहसीलदार कार्यालय नजिकच्या ११५ गुंठे जागेत ही तीन मजली प्रशस्त इमारत बांधण्यात येणार असून यासाठी शासनाने ३५ कोटी रूपये मंजूर केले आहेत. यात प्रशस्त न्यायाधीश दालन, पक्षकार व वकिलांसाठी बसण्याची व्यवस्था, बाल साक्षीदारांसाठी स्वतंत्र व्यवस्था, विकलांग पक्षकारांसाठी सुविधा, साक्षीदार व आरोपी यांना सेटरेट बसण्याची व्यवस्था, कॅन्टींग, न्यायाधीशांसाठी बंगले अशी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. याच धर्तीवर देवगड येथील न्यायालयाची नवीन इमारत बांधण्यात येणार आहे.असे अॅड.देसाई यांनी सांगितले. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गवई आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपाध्याय यांच्या या सिंधुदुर्ग जिल्हा दौ-याने कुडाळ, देवगडसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकिल व न्यायालयीन वर्गा मध्ये उत्साह निर्माण झाला आहे. त्यांच्या या दौ-यामुळे सावंतवाडी आणि मालवण न्यायालयाच्या प्रलंबित कामाचा प्रश्न दूर होऊन, या न्यायालयांच्या इमारत कामाला गती मिळेल तसेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याशी जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यांना जिल्ह्यात येण्यासाठी निमंत्रण देण्यात येणार असून, लवकरच त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहीती अॅड. देसाई यांनी यावेळी दिली.