
सावंतवाडी : चौकुळ गावातील ज्ञानमंदिर ठरलेल्या जि. प. प्राथ. शाळा चौकुळ नं. 4 म्हाराठी येथे वर्धापन दिन व माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच गुलाबराव गावडे, केंद्र प्रमुख भावना गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सायली गावडे, पोलीस पाटील रवींद्र गावडे यांच्यासह गावातील मान्यवर, आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विशेष दिनानिमित्त माजी विद्यार्थी रमेश गावडे व नामदेव गावडे यांनी आणलेला केक सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कापण्यात आला.
शाळेची स्थापना 15 ऑगस्ट 1955 रोजी झाली असून, गेल्या 70 वर्षांपासून ही शाळा ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य उजळवत आहे.
कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा देत शाळेबद्दल मनोगते व्यक्त केली. सरपंच गुलाबराव गावडे यांनी शिक्षणाविषयी असलेले आपले प्रेम व्यक्त करून, शाळेसाठी तात्काळ 1000 रुपये रोख मदत, शौचालय बांधकामासाठी 50,000 रुपये निधी तसेच एक कपाट भेट देण्याची घोषणा केली. त्यांच्या या जाहीर वक्तव्याने सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
केंद्र प्रमुख भावना गावडे यांनी शाळेबद्दल आपले विचार मांडून विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी प्रशासकीय मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नारायण गावडे यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक जावेद तांबोळी यांनी प्रास्ताविक करून शाळेत वर्षभर राबवलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला व आगामी नियोजनाची माहिती दिली.विद्यार्थी अथर्व गावडे याने मनोगत व आभार मानले.
या मेळाव्याने गावातील जुन्या आणि नव्या पिढीतील शालेय नात्यांची एकत्र येऊन मैत्री व एकात्मतेची भावना अधिक दृढ केली. शाळेच्या भिंतींना आज जुन्या आठवणींचा सुवास लाभला आणि नवीन स्वप्नांची उजळणी झाली.










