
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुळ नं. ४ मराठी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ व उत्साहात संपन्न झाले. या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन चौकूळ मराठी वाडीतील निवृत्त सैनिक गजानन गावडे आणि नामदेव गावडे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देणारे व्यासपीठ म्हणजेच वार्षिक स्नेहसंमेलन होय. या व्यासपीठावरून आपल्या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने पालकांची उपस्थित होती. त्यामध्ये विशेषत: महिलांची उपस्थिती दर्शनीय होती.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, नाटक, गाणी आणि देशभक्तीपर सादरीकरणांमुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले. शाळेच्या इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी जलवा तेरा जलवा या देशभक्ती गीतावर केलेले नृत्य विशेष ठरले. लहान चिमुकली आरोही गावडे हिने आजच्या मोबाईलच्या दुनियेत हरवत चाललेले पालकत्व आणि लहान चिमुकल्यांची व्यथा मांडून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या वार्षिक स्नेह संमेलनामध्ये शैक्षणिक, क्रीडा व इतर क्षेत्रांत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण उपक्रम डिजिटल क्यू आर कोड असलेले कॅलेंडर चे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक जावेद तांबोळी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार नामदेव गावडे यांनी मानले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सायली गावडे, प्रा.मधुकर गावडे,पोलीस पाटील रवींद्र गावडे, ग्राम पंचायत सदस्य संजना गावडे तसेच गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.