भारतातील एकमेव महिला फ्री-डायव्हिंग प्रशिक्षक

चिपळुणातील समृद्धी देवळेकरचा सन्मान
Edited by: मनोज पवार
Published on: October 21, 2025 15:42 PM
views 29  views

चिपळूण : कोकणाची सुकन्या आणि चिपळूणच्या माजी नगरसेवक राजू देवळेकर यांची कन्या समृद्धी देवळेकर हिने महाराष्ट्राचं नाव अभिमानाने उंचावलं आहे. समृद्धीला महाराष्ट्रातील एकमेव फ्री-डायव्हिंग प्रशिक्षक म्हणून मान्यता मिळाली असून, हा बहुमान चिपळूणसाठीही अभिमानाचा क्षण ठरला आहे.

समृद्धीने आपल्या मेहनती, जिद्द आणि ध्येयाने आंतरराष्ट्रीय पातळीवर चिपळूणचं नाव उज्ज्वल केलं आहे. ती आता प्रमाणित फ्री-डायव्हिंग इन्स्ट्रक्टर बनली असून, अशी मान्यता मिळवणाऱ्यांपैकी ती भारतातील मोजक्या व्यक्तींमध्ये एक आहे. फ्री-डायव्हिंग ही एक अनोखी आणि आव्हानात्मक जलक्रीडा आहे, ज्यामध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा वापर न करता फक्त एका श्वासावर समुद्राच्या खोल तळाशी प्रवेश केला जातो. ही खेळकला प्रचंड एकाग्रता, मानसिक संतुलन आणि शारीरिक ताकद मागते. समृद्धीचा ठाम विश्वास आहे की, “भारतीयांमध्ये फ्री-डायव्हिंगसाठी अपार क्षमता आहे. योग्य प्रशिक्षण आणि प्रोत्साहन मिळाल्यास भारतातील अनेक तरुण या क्षेत्रात चमकू शकतात.”