जिल्हास्तरीय शालेय शासकीय सायकलिंग स्पर्धा

रत्नागिरीतील अनेक शाळांचा सहभाग
Edited by: मनोज पवार
Published on: September 19, 2025 14:22 PM
views 42  views

चिपळूण : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि रत्नागिरी जिल्हा सायकलिंग असोसिएशन यांच्या अंतर्गत जिल्हास्तरीय शालेय शासकीय सायकलिंग स्पर्धा - 2025-26 दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी SVJCT क्रीडा संकुल डेरवण येथे उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेमध्ये विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल शिरळ गुरुकुल मधील खेळाडूने उत्तम कामगिरी करीत यश संपादन केले. 14 वर्षे मुलांमध्ये मिथिल टाकळे या विद्यार्थ्याने टाइम ट्रायल या प्रकारात 5 ते 7 किमी अंतरासाठी 11.48 मिनिटे वेळ नोंदवत द्वितीय क्रमांक पटकावला व पुढे कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेमध्ये स्थान निश्चित केले आहे.

यासाठी प्रशाळेचे क्रीडा शिक्षक विनोद राऊत तसेच प्रशालेचे क्रीडाविभाग प्रमुख सुश्रुत चितळे, आदित्य तांबे तसेच मुख्याध्यापक जान्हवी टाकळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या यशाचे चेअरमन चंद्रकांत सावर्डेकर, गुरुकुल प्रबंधक मोहन भिडे व प्रकल्प समन्वयक प्रसाद सनगरे तसेच संस्थेच्या सर्व सभासदांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.