
चिपळूण : युनायटेड इंग्लिश स्कूल ही ऐतिहासिक पावन भूमी आहे, जिथे लालबहादूर शास्त्री, सी. डी. देशमुख, मोरारजी देसाई, दुर्गाताई भागवत यांसारखी उत्तुंग व्यक्तिमत्त्वे येऊन गेलेली आहेत. त्यांच्या पदस्पर्शाने आणि साहित्याने या परिसराला प्रेरणादायी वसा लाभला आहे. साहित्य संमेलन, बालनाट्य संमेलन यांसारखे अनेक भव्य सांस्कृतिक उपक्रम येथे पार पडले आहेत. अशाच या प्रेरणादायी वातावरणात रविवारी “वाचू आनंदाने” हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. या वेळी उपस्थितांना संबोधित करताना युनायटेड इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध यांनी सांगितले की, “नगर परिषदेने सुरू केलेला ‘वाचू आनंदाने’ हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. समाजहिताचे अन्य उपक्रमही नगर परिषदेने राबविले असून त्यांचे कौतुक केले पाहिजे.”
प्रत्येक रविवारी सकाळी दोन तास निसर्गाच्या सानिध्यात वाचन करण्याचा ‘वाचू आनंदाने’ हा उपक्रम चिपळूण नगर परिषद, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला आहे. पावसाळ्यात या उपक्रमाला तुलनेने कमी प्रतिसाद मिळत होता. मात्र, पावसाळा ओसरल्यानंतर या रविवारी युनायटेड इंग्लिश स्कूलच्या परिसरात झालेल्या २५व्या रविवारच्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
गेल्या अनेक महिन्यांपासून हा उपक्रम जंगल, धामणवणे, गांधारेश्वर, नारायण तलाव आदी निसर्गरम्य ठिकाणी पार पडत आहे. या वेळी युनायटेड इंग्लिश स्कूलच्या निसर्गरम्य परिसरात, कौलारू इमारतींच्या सानिध्यात वाचनाची बैठक पार पडली. दोन तास मोबाईलपासून दूर राहून, वाचनाचा आनंद घेणारे शिक्षक, प्राध्यापक, साहित्यिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय यांच्या वतीने पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली होती. यामुळे संपूर्ण परिसर वाचनप्रेमींच्या उपस्थितीने गजबजून गेला.
या कार्यक्रमाला युनायटेड इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध, उपमुख्याध्यापक संजय बनसोडे, पर्यवेक्षिका श्रीमती रेवती करदगे, संदीप मुंडेकर, श्री. धापशी, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे कार्यकारी मंडळाचे सदस्य कवी अरुण इंगवले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, चिपळूण नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, लोकमान्य टिळक वाचनालयाचे संचालक विनायक ओक, प्रा. स्नेहल कुलकर्णी, शिक्षक मंगेश खेडेकर, विश्राम सूर्यवंशी, अजित चव्हाण, गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका पद्मजा येसादे, पर्यवेक्षिका सविता कर्वे, प्रायमरी स्कूलच्या प्रमुख साक्षी गोरिवले, शिक्षक तुषार जाधव, उद्यान विभागप्रमुख बापू साडविलकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. निसर्गाच्या सानिध्यातील वाचनाची गोडी जपत ‘वाचू आनंदाने’ उपक्रम आता चिपळूणकरांच्या जीवनशैलीचा भाग ठरत आहे.