
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्था सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, सावर्डे या संस्थेच्या अध्यक्षपदी नामदेव गावडे, उपाध्यक्षपदी शैलेश सुर्वे तर सचिवपदी बाबू सुर्वे यांची निवड एकमताने करण्यात आली. त्याचबरोबर संचालक मंडळावर महेश गंगावणे, प्रशांत सकपाळ, सतीश पालकर, तुकाराम पाटील, मंगेश दाते, मिलिंद पाटील, विराज सावंत, सचिन पोकळे, प्रशांत पवार, शरद भोसले, प्रशांत राजेशिर्के, शिल्पा राजेशिर्के व मैथिली राजेशिर्के यांचीही निवड करण्यात आली आहे. सर्व संचालकांची निवड सर्वानुमते झाल्याने संस्थेमध्ये ऐक्याचे व सहकाराचे द्योतक दिसून आले. नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकांचे आमदार शेखर निकम यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून भावी कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना आमदार निकम म्हणाले, “सह्याद्री सेवकांची पतसंस्था ही संस्थेच्या सेवकांची खरी सोबती आहे. सभासदांच्या अडीअडचणीच्या वेळी मदतीला धावून जाणे हेच या पतसंस्थेचे वैशिष्ट्य आहे. पतसंस्थेने आजवर केलेले पारदर्शक व निष्कलंक कामकाज कौतुकास्पद आहे. सभासदांना वेळेवर आवश्यक त्या सेवा पुरवून, संस्थेचा असलेला ‘अ’ दर्जा कायम ठेवण्यासाठी सर्व पदाधिकारी व संचालक मंडळाने एकजुटीने प्रयत्न करावेत.”
निवडीनंतर अध्यक्ष नामदेव गावडे यांनी विश्वास व्यक्त करताना सांगितले की, “सभासदांचा विश्वास हीच आमची खरी ताकद आहे. पतपेढीचे कार्य अधिक कार्यक्षमतेने व पारदर्शकतेने करून संस्थेची प्रगती कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल.” उपाध्यक्ष शैलेश सुर्वे व सचिव बाबू सुर्वे यांनीही संस्थेच्या सेवाभावी कार्याचा धागा पुढे नेण्याचे आश्वासन दिले.
पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाला सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक मारुतराव घाग, शांताराम खानविलकर आकांक्षा पवार चंद्रकांत सुर्वे मानसिंग महाडिक सचिव महेश महाडिक सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार शेखर निकम यांचेही मार्गदर्शनाबद्दल आभार मानले.










