
सावर्डे : भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त रोटरी क्लब, चिपळूण यांच्या वतीने शहरात भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम विद्यालयाची धावपटू इच्छा राजभरणे हिने १४ वर्षे वयोगटातील २ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून विजयश्री संपादन केली.
स्पर्धेत परिसरातील २५० हून अधिक धावपटूंमध्ये इच्छाने अप्रतिम वेग आणि जिद्दीच्या जोरावर सुवर्ण कामगिरी केली. यापूर्वीही इच्छाने यंग इंडिया क्लब, मुंबई आयोजित मॅरेथॉनमध्ये प्रथम क्रमांक मिळवून राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव प्राप्त केला आहे. दरम्यान, महिलांच्या खुल्या गटातील मॅरेथॉन स्पर्धेत हुमेरा सय्यद हिने द्वितीय क्रमांक पटकावला. दोन्ही विजेत्या खेळाडूंना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दाद दिली.
या यशामागे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगावे व प्रशांत सकपाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विजयाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखरजी निकम, ज्येष्ठ संचालक व शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, सचिव महेश महाडिक, प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी इच्छाचे व हुमेराचे अभिनंदन केले.