शिव्यांमागची भक्ती, कटू शब्दांमागचं मातृत्व !

श्रीकृष्ण व्याख्यानमालेत डॉ. मंजुश्री गोखले यांनी सांगितली अवलीबाईंची खरी गोष्ट
Edited by:
Published on: August 14, 2025 10:37 AM
views 91  views

चिपळूण : गेल्या शेकडो वर्षांपासून संत तुकाराम महाराज यांच्या पत्नी अवलीबाई यांना लोककथांमधून, नाटकांतून, चित्रपटांतून आणि विशेषतः कीर्तनातून भांडकुदळ, कठोर स्वभावाची म्हणून रंगवले गेले, पण हा फक्त एकतर्फी दृष्टिकोन आहे, असे सांगून सुप्रसिद्ध लेखिका आणि ‘तुकयाची अवली’ या चर्चित कादंबरीच्या लेखिका डॉ. मंजुश्री गोखले यांनी अवलीबाईंचा एक वेगळा, मानवी आणि भावनिक पैलू श्रीकृष्ण व्याख्यानमालेत उलगडून दाखवला. "अवली क्षणाची पत्नी झाली, पण अनंत काळाची आई झाली. कलंदर संत तुकोबांना सांभाळण्याचे काम तिने 'माता’ म्हणून केले," अशा शब्दांत त्यांनी अवलीबाईंचा सन्मान केला.

लक्ष्मीनारायण मंदिरात आयोजित ९७ वर्षांच्या परंपरेची महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाची श्रीकृष्ण व्याख्यानमाला सुरू आहे. बुधवारी पाचव्या पुष्परूपाने डॉ. गोखले यांनी ‘तुकयाची अवली’ या विषयावर आपले विचार मांडले.

मेघना चितळे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. मृणाल चितळे यांच्या हस्ते देवस्थानतर्फे डॉ. गोखले यांचा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. गुरुवारी या व्याख्यानमालेचा समारोप होणार असून कवयित्री-लेखिका डॉ. नीलम माणगावे ‘छोट्यांच्या मोठ्या गोष्टी’ या विषयावर शेवटचे व्याख्यान करतील.

मंजुश्री गोखले या मराठीतील विविध साहित्य प्रकारांमध्ये लेखन करणाऱ्या प्रगल्भ लेखिका आहेत. कविता, लघुकथा, कादंबरी, पाकशास्त्र, प्रवासवर्णन अशा विविध क्षेत्रांत त्यांनी लेखन केले आहे.

पूर्वी इचलकरंजीच्या माॅडर्न हायस्कूलमध्ये शिक्षिका असलेल्या गोखले या नंतर कोल्हापूरमधील महाराष्ट्र कॉलेजमध्ये उपप्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या. आजपर्यंत त्यांची सुमारे २५ पुस्तके प्रकाशित झाली असून ‘तुकयाची अवली’ या कादंबरीला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच ‘सासूची माया’ या मराठी चित्रपटासाठी त्यांनी पटकथा व संवादही लिहिले आहेत.

व्याख्यानात सुरुवातीला डॉ. गोखले यांनी सांगितले की, अवलीबद्दल एक ओळीचीच माहिती सहज मिळते. "पुण्याजवळील परगण्यात सधन सावकार आप्पाजी बुवडवे यांची मुलगी अवली." ही माहिती अपुरी वाटल्याने त्यांनी अधिक शोध सुरू केला. सांगलीतील गुडवे कुटुंबीयांना भेटल्या. अवलीचे माहेर गुडवे होते. औरंगाबादेतही त्यांनी यु. म. पठाण यांच्यासारख्या साहित्यिकांच्या भेटी घेतल्या.

"तुकोबांना कमी लेखण्याचा माझा हेतू नाही, त्यांची उंची खूपच मोठी आहे, पण अवलीला तुकोबांच्या पायाशी ठेवायचे नाही, तर तिला जमिनीतून वर काढून लोकांसमोर आणायचे आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

अवलीबाईंचा जीवनपट मांडण्याचा निश्चय करून गोखले सलगपणे लिहायला बसल्या. "मी एका ओळीतून पुढे लिहित गेले, एकही शब्द खोडून पुन्हा लिहिला नाही. तो मूळ हस्तलिखित डायरी आजही पाहू शकता," असे त्यांनी सांगितले. प्रकाशनाची तयारी मात्र सहा महिने चालली. पुण्यातील मैत्रीण शामला देसाई यांच्या माध्यमातून त्यांची ओळख डॉ. अशोक कामत यांच्याशी झाली. "पहिला दगड पडला, तरी मी छातीवर घेईन," असे सांगत कामत यांनी कादंबरी प्रकाशनासाठी मोठे प्रोत्साहन दिले. मेहता प्रकाशनाने अवघ्या पाच महिन्यांत ‘तुकयाची अवली’ बाजारात आणली आणि आज तिची सातवी आवृत्ती सुरू आहे.

डॉ. गोखले म्हणाल्या, "अवली भांडखोर नव्हती. तिला गाडी-घोडे नको होते, फक्त मुलांच्या पोटात अन्न मिळावे एवढीच तिची अपेक्षा होती. मी भाकरी बनवली, तर भाजीसाठी लागणारे साहित्य आणा, एवढेच ती म्हणायची. ही अपेक्षा पूर्ण न झाल्यावरच तिने विठ्ठलाला शिव्या दिल्या. हे तिच्या भक्तीतील परखडपणाचे लक्षण होते."

संसारासाठी तिने दोनदा माहेरून पैसे आणून तुकोबांना व्यापारासाठी दिले, पण त्यातही यश आले नाही.

"स्त्री ही क्षणाची पत्नी असते, पण अनंताची माता असते. कलंदर संताला सांभाळणे ‘आई’ झाल्याशिवाय शक्य नाही. अवली ‘आई’ झाली, आणि तिने तुकोबांना सांभाळले," असे त्यांनी अधोरेखित केले.

भक्तीचा समभुज त्रिकोण अवली, तुकाराम महाराज आणि विठ्ठल हा एक समभुज त्रिकोण आहे, असे त्यांनी सांगितले. माऊलीचा विठ्ठलावर तितकाच अधिकार आहे. तुकाराम महाराजांनी गुरुकुल संस्कारातील पंचीकरण अवलीला शिकवले होते, याचा अर्थ तिची योग्यता त्यांना माहीत होती. "तिची विरोधी भक्ती पराकोटीची होती, त्यामुळेच तिला विठ्ठलाला शिव्या देण्याचाही अधिकार होता," असे डॉ. गोखले यांनी विश्लेषण केले.

"आपण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतो, पण त्यांना माता बनून सांभाळणारी ही ‘जगत माता’ नाही का? तिची उपेक्षा झाली, हे विसरून चालणार नाही," असा सवाल त्यांनी उपस्थित केला. व्याख्यानाच्या शेवटी त्यांनी सांगितले की, "आज मला ‘अवलीकार’ म्हणून ओळख मिळते, ते अवलीमुळेच. तिची खरी कथा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे समाधान शब्दात मांडता येणार नाही."