
रत्नागिरी : कला व विज्ञान महाविद्यालय, सावर्डे येथे आयोजित पर्यावरण जागृती कार्यक्रमात डॉ. राहुल भागवत यांनी प्राणी, पक्षी आणि वनस्पतींच्या संरक्षणाविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, झाडे आपल्याला मोफत ऑक्सिजन पुरवतात, परंतु त्याचे मूल्य आपण जाणत नाही. काही प्राणी आणि पक्षी फळे, फुले व झाडांमुळे आपल्याला साधन संपत्ती देतात, त्यामुळे पर्यावरणाची साखळी टिकवण्यासाठी त्यांचे संरक्षण करणे ही मानवाची जबाबदारी आहे.
सर्पांविषयी गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न डॉ. भागवत यांनी स्पष्ट केले की सर्व साप विषारी नसतात. विद्यार्थ्यांना विषारी साप ओळखण्याची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून देण्यात आली. साप हे शेकडो उंदीर खातात, त्यामुळे शेतीचे अस्तित्व टिकवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे सापांना मारणे हा उपाय नसून सजगता आणि माहिती यावर भर देणे आवश्यक आहे.
चित्रफितीच्या माध्यमातून प्रबोधन
निसर्गातील बदल, प्राणी व पक्ष्यांचे पर्यावरणातील योगदान यावर आधारित चित्रफिती दाखवून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. तानाजी कांबळे, प्रा. माधुरी जाधव उपस्थित होते. सूत्रसंचालन पूजा आवळे यांनी केले, तर पाहुण्यांचे स्वागत वाघचौरे मॅडम यांनी केले. आभार पाहुणे प्रा.अवनी कदम यांनी मानले.