
चिपळूण : चिपळूण शहरातील पेठमाप व गोवळकोट भागातील पाच बौद्ध वाड्यांच्या दफनभूमी वजा स्मशानभूमीतील गैरसोयी तसेच अन्य विकास कामांच्या मागण्यांच्या अनुषंगाने महायुती पदाधिकारी आणि नगर पालिकेचे मुख्याधिकारी, तसेच प्रशासक यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नागरिकांच्या तातडीच्या गरजांवर सविस्तर चर्चा होऊन काही कामांना तत्काळ मंजुरी देण्यात आली.
गेल्या काही दिवसांपूर्वी पाच बौद्ध वाड्यांतील बांधवांनी दफनभूमीतील गैरसोयी, पायाभूत सुविधांची कमतरता आणि काही प्रलंबित विकास कामे लवकर मंजूर करण्याची मागणी करत स्वातंत्र्य दिनापासून अन्नत्याग उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाची गंभीर दखल आमदार शेखर निकम यांनी घेतली. त्यांनी महायुतीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कदम बौद्धवाडीत जाऊन नागरिकांची बैठक घेतली आणि समाजाच्या अडचणी जाणून घेतल्या.
या वेळी आमदार निकम यांनी, आमदार निधीतून शक्य असलेली विकासकामे तातडीने हाती घेण्याचे आश्वासन दिले. तसेच, राज्य सरकारमार्फत कराव्या लागणाऱ्या कामांसाठी स्वतः पाठपुरावा करून ती कामे मंजूर करून देण्याची ग्वाही दिली. नगर पालिकेमार्फत होणाऱ्या कामांसाठीही मुख्याधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मार्गी लावण्याचे ठरले. त्यानुसार सोमवारी नगर पालिका मुख्याधिकारी व प्रशासक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
बैठकीत बौद्ध समाजाच्या अडचणींची माहिती घेतल्यानंतर मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी शक्य ती कामे तातडीने मंजूर करून लगेच सुरू करण्याचे संबंधित विभागांना आदेश दिले. तसेच, मोठ्या निधीसाठी आमदारांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला जाईल, असेही आश्वासन दिले.
या बैठकीस पाच वाड्यांतील पंचप्रमुख, त्यांची समिती, तसेच मोठ्या संख्येने बौद्ध समाज बांधव उपस्थित होते. महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष मिलिंद शेठ कापडी, शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ, भाजप जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे, भाजप शहराध्यक्ष शशिकांत मोदी, आरपीआय तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते, शहर कार्याध्यक्ष व महायुती समन्वयक उदय ओतारी, महिला अध्यक्ष अदिती देशपांडे, माजी उपनगराध्यक्ष बापूसाहेब काणे, माजी नगरसेवक विजय चितळे, किशोर रेडीज, करामत मिठागरी, नगरसेविका स्वाती दांडेकर, आरपीआय शहराध्यक्ष मंगेश जाधव, मागासवर्गीय तालुकाध्यक्ष विशाल जानवलकर, तसेच बौद्ध समाज पदाधिकारी सुभाष जाधव, संदेश कदम, अमोल कदम, उमेश सकपाळ, निनाद आवटी उपस्थित होते. नगर पालिकेच्या वतीने प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, बांधकाम विभागाचे निंबाळकर, आरोग्य विभागाचे वैभव निवाते, अतिक्रमण विभाग प्रमुख संदेशजी टोपरे उपस्थित होते.
सर्व संबंधितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे बैठक यशस्वीरीत्या पार पडली असून, पाच बौद्ध वाड्यांच्या नागरिकांना आवश्यक सुविधांचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.