
चिपळूण : “कलेने मला आई म्हणून, पत्नी म्हणून आणि मुलगी म्हणून आत्मभान दिलं. आत्मभान म्हणजे स्वतःला मोठं करणं नव्हे, तर त्याला सतत कामातून उजाळा देणं होय. आत्मभानाची पणती कायम पेटती ठेवायला हवी,” अशी भावना सुप्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका, कवयित्री, दिग्दर्शिका आणि अभिनय क्षेत्र सोडून आनंदाची शेती करणाऱ्या संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांनी व्यक्त केली.
शहरातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात सुरू झालेल्या श्रीकृष्ण व्याख्यानमालेचा यंदाचे यंदा ९७वे वर्ष असून, यंदा सर्व महिला व्याख्यात्यांचा सहभाग आहे. रविवारी व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी ‘कलेतील आत्मभान’ या विषयावर संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांनी मनोगत मांडले. सुरुवातीला शिक्षिका वैशाली चितळे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला, तर देवस्थानतर्फे मेघना साठे यांनी पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन स्वागत केले.
संपदा जोगळेकर-कुळकर्णी म्हणाल्या, “व्यावसायिक रंगभूमीवर १९९१मध्ये नीना कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पदार्पण केले. ‘आईचं घर उन्हात’ हे नाटक करत असताना नीना कुलकर्णी यांनी रंगभूमीकडे पाहण्याचं खरं आत्मभान दिलं. कलाकार कधी थांबत नाही, मात्र ‘आत्मभान’ हा फसवा शब्द असून, खरी गरज रंगभूमीच्या आत्म्याचं भान राखण्याची आहे.”
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “विविध नाटकांमधील अनुभवातून मला सुंदर बोलण्याची जाण आली आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांमधून मी निवेदनाकडे वळले. छान शब्दसंपदा आणि दाद यामुळे मी सूत्रसंचालिका झाले. आज २१व्या शतकातही महिलेच्या पायात अदृश्य साखळ्या आहेत, याची खंत आहे. मी केवळ सोशल मीडियावर पोस्ट टाकणारी, रिल्स बनवणारी कलाकार नाही, तर कलेचा गांभीर्याने विचार करणारी चैतन्यशील कलाकार आहे. ‘क’ म्हणजे क्रिया आणि ‘ल’ म्हणजे लावण्य, म्हणजेच सौंदर्यपूर्ण क्रिया, हाच कलेचा अर्थ.”
सेलिब्रिटी असूनही पाय जमिनीवर ठेवण्याचं व कलेतून आनंद मिळवण्याचं संस्कार आईने दिल्याचे सांगून त्यांनी, “चेहऱ्यावरचं हसू हे कलेतून आलेल्या आनंदाचं प्रतिबिंब असतं,” असं मत व्यक्त केलं. व्याख्यानादरम्यान त्यांनी दोन कविता सादर केल्या व ‘गुंफियेला शेला’ या स्वतःच्या पुस्तकातील एक कथा वाचून दाखवली.
प्रेक्षकांना आवाहन करताना त्या म्हणाल्या, “कलाकाराला कोणत्याही एका चौकटीत बांधू नये. तो जे नवं निर्माण करतो, ते स्वीकारलं पाहिजे.” अभिनयातून निवृत्ती घेतल्यानंतर सध्या पतीसमवेत शेतीत रमल्याचे त्यांनी सांगितले. “आम्ही पिकवलेलं उत्पादन स्वतःसाठी आणि पर्यटकांसाठी वापरतो, आणि आनंदाने जगतो,” असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी वैशाली चितळे यांनी आभार मानले. लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे मार्गदर्शक प्रकाश देशपांडे, मकरंद साठे, सचिन कुलकर्णी, कानडे सर, किशोर फडके आदी मान्यवर उपस्थित होते.