
चिपळूण : समाजाचे आयुष्य सुखी करण्यामध्ये शास्त्रीय शोधांचे आणि प्रगतीचे शिल्पकार असणाऱ्या शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांचे योगदान अतुलनीय आहे. भारतात शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडत असून, शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांतूनच पुढील पिढीतील वैज्ञानिक आणि विवेकी नागरिक घडतील. शास्त्रीय संशोधन हे समाजाभिमुख असावे, देशातील प्रश्न सोडविण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा, अशी भूमिका भारतीय विज्ञान जगताने निभावली आहे. गेल्या ७५ वर्षांत आपण देश म्हणून विज्ञान क्षेत्रात जी झेप घेतली, त्यापेक्षा जास्त प्रगती पुढील ७५ वर्षांत साधता येईल, असा विश्वास विविध भाषांच्या अभ्यासक आणि संशोधन क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. अभिधा घुमटकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील सर्वांत जुन्या व्याख्यानमालांपैकी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या चिपळूण येथील श्री लक्ष्मीनारायण देवस्थानच्या श्रीकृष्ण व्याख्यानमालेचे यंदाचे ९७वे वर्ष शनिवारपासून सुरू झाले. या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना डॉ. घुमटकर “विज्ञानाचा इतिहास” या विषयावर बोलत होत्या. लंडनची फेलोशिप मिळविणाऱ्या भारतातील पहिल्या दृष्टिहीन महिला आणि महाराष्ट्रातील पहिल्या अंध व्यक्ती हा मान मिळविणाऱ्या डॉ. घुमटकर साठ्ये महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख आहेत. कोकणी व मराठी या मातृभाषांबरोबरच संस्कृत, इंग्रजी, सिंधी, बंगाली, उर्दू, इटालियन, पर्शियन, जर्मन, फ्रेंच आणि अरेबिक या भाषांवरही त्यांचा दांडगा अभ्यास आहे.
आपल्या व्याख्यानात त्यांनी सुप्रसिद्ध वैद्य व संस्कृत पंडित भाऊ दाजी लाड यांचा विशेष उल्लेख केला. दाजींनी प्राचीन संस्कृत वैद्यकशास्त्राचा सखोल अभ्यास करून कुष्ठरोगावर उपचार शोधले. १८५०मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी मुंबईत वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि अल्पावधीतच मोठे यश संपादन केले. महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी मोठे योगदान दिले, त्यांच्या नावाने मुलींची शाळा स्थापन करण्यात आली. १८५२मध्ये ते मुंबई शिक्षण मंडळावर निवडून आले, तसेच ग्रँट मेडिकल कॉलेज सोसायटीचे अध्यक्षपद भूषविले. जगभरातील अनेक वैज्ञानिक आणि वैद्यकीय संस्थांचे ते मानद सदस्य होते.
भारतात संशोधनाच्या विविध क्षेत्रांत जागतिक पातळीवर वेगळे स्थान निर्माण झाले आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र, कृषी, अभियांत्रिकी, अवकाश संशोधन आणि सामाजिक विज्ञान या सर्वच क्षेत्रांमध्ये भारतीय संशोधकांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. पांडुरंग खुजे, प्रभाकर मोडक, भिसे यांसारख्या संशोधकांनी त्यांच्या-त्यांच्या विशेष क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले असून, त्यांच्या चिकाटी, परिश्रम आणि नवोन्मेषी विचारसरणीमुळे भारतीय संशोधनाचा गौरव आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढला आहे.
डॉ. घुमटकर यांनी संरक्षण संशोधन संस्था (डीआरडीओ), भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो), वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर), भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) यांच्या कार्याचा आढावा घेतला. आज संशोधन हे केवळ प्रयोगशाळेत मर्यादित नसून, त्याचा समाजाच्या विकासावर थेट परिणाम होत आहे. त्यामुळे संशोधकांचे योगदान केवळ शास्त्रीय प्रगतीतच नव्हे, तर देशाच्या सर्वांगीण विकासातही महत्त्वाचे ठरते, असे त्यांनी सांगितले.