
चिपळूण : कोकणची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिपळूणने पुन्हा एकदा नाट्यकलेप्रती असलेले प्रेम आणि परंपरा जिवंत ठेवल्याचे सिद्ध केले. मराठी रंगभूमीवरील पहिले सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यापासून ते आजच्या आघाडीच्या अभिनेता ओंकार भोजनेपर्यंत अनेक प्रतिभावान कलाकार या भूमीतून घडले आहेत. राज्य नाट्यस्पर्धा, एकांकिका स्पर्धा, पारावरची नाटके अशा विविध नाट्यप्रकारांनी येथील रंगभूमी नेहमीच गजबजलेली असते. आजही शहरात पाच ते सहा ठिकाणी दरवर्षी नियमित नाटके सादर होतात.
या नाट्यसंपन्नतेत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अनेक कलाकारांची कला येथे प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. मात्र २००५च्या महापुरात हे केंद्र बंद पडल्याने चिपळूणच्या नाट्यचळवळीला मोठा धक्का बसला. त्यानंतर ‘नाटक कंपनी चिपळूण’ने अभिनेता ओंकार भोजनेच्या माध्यमातून काही प्रयोग सुरू ठेवले, तसेच नाट्यसंयोजक योगेश कुष्टे यांनी बांदल हायस्कूलच्या हॉलमध्ये नाट्यप्रयोगांचे आयोजन केले. तरीदेखील चळवळीला पूर्वीची गती मिळाली नाही.
रंगकर्मींनी सांस्कृतिक केंद्रासमोरील पारावर दर रविवारी कार्यक्रम घेण्याची 'गांधीगिरी' सुरू केली आणि अखेर दोन वर्षांपूर्वी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र पुन्हा सुरू झाले. त्यामुळे कोकणच्या या सांस्कृतिक नगरीला पुन्हा एकदा वैभव प्राप्त झाले. याच काळात अनेक वर्षे बंद असलेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, चिपळूण शाखा पुनर्जीवित झाली. अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली बालनाट्य शिबिरांपासून हौशी नाट्यसंयोजनापर्यंत अनेक उपक्रम सुरू करण्यात आले.
या पुनरुज्जीवित चळवळीत एक नवा मैलाचा दगड ठरला ‘आनंदयात्री पु. ल. – एक समग्र दर्शन’. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि विनोदी व्यंगचित्रकार पु. ल. देशपांडे यांच्या २५व्या स्मृतीनिमित्त, मंदार ओक यांच्या संकल्पना व संहितेतून हा कार्यक्रम आकाराला आला. जवळपास वर्षभर त्यांनी साहित्याचा अभ्यास करून दर्जेदार मांडणी तयार केली. सहा ऑगस्ट रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात सादर झालेल्या या नाट्यप्रयोगात लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सुमारे ३५ ते ४० स्थानिक कलाकार सहभागी झाले. सर्वांनी मिळून एकजुटीने हा प्रयोग साकारला.
अनेक वर्षांनंतर स्थानिक कलाकारांच्या नाटकाला प्रेक्षकांनी एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला की, ‘हाऊसफुल’चा बोर्ड लावावा लागला. सांस्कृतिक केंद्र पुन्हा सुरू झाल्यानंतर ‘करून गेलो गाव’ आणि ‘वस्त्रहरण’ अशा काही मोजक्याच नाटकांना हाऊसफुलचा मान मिळाला होता. मात्र अखिल भारतीय नाट्य परिषद, चिपळूण शाखा आणि स्थानिक कलाकारांच्या संयुक्त प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या ‘आनंदयात्री पु. ल.’ या कार्यक्रमाने ही यादी गौरवाने वाढवली. या प्रयोगाच्या यशामागे नाट्यसंयोजक योगेश कुष्टे यांचे नि:स्वार्थी परिश्रम मोठे आहेत. जाहिरातींपासून तिकीटविक्रीपर्यंत सर्व जबाबदाऱ्या त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतल्या. नाट्य परिषदेचे सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी हाऊसफुलचा बोर्ड स्वतः लावला आणि अनेक वर्षांनंतर चिपळूणकरांना आपल्या नाटकासाठी हा क्षण अनुभवायला मिळाला.
प्रयोगात ज्येष्ठ रंगकर्मी आणि नाट्य परिषद उपाध्यक्ष दिलीप आंब्रे यांनी साकारलेले ‘नारायण’ हे पात्र विशेष ठरले. “कार्य कुठलेही असो, नारायण हवाच” अशा ओळखीचे हे पात्र लहानमोठ्या सर्व कामात पारंगत, सर्व विषयांवर अभ्यासू आणि स्पष्टवक्ते आहे. वास्तविक जीवनातही दिलीप आंब्रे यांचा नाट्य परिषदेतील कार्यतत्पर स्वभाव ‘नारायण’च्या भूमिकेतून झळकला. त्यांच्या दमदार अभिनयाला संजय सरदेसाई, सुनेत्रा आपटे, ॲड. विभावरी रजपूत, प्राची जोशी, विभावरी जाधव, संदीप जोशी, अजय यादव, मंगेश बापट, शरद तांबे आणि आर्या पोटे यांनी प्रभावी साथ दिली.
नाट्य परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉ. मीनल ओक यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले आणि सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमाला उपस्थित आमदार शेखर निकम यांनी स्थानिक कलाकारांच्या या प्रयत्नाचे कौतुक करत ११ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. ‘आनंदयात्री पु. ल. – एक समग्र दर्शन’ हा कार्यक्रम केवळ पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचा उत्सव नव्हता, तर चिपळूणच्या नाट्यचळवळीत नवा उत्साह निर्माण करणारा ऐतिहासिक क्षण ठरला. स्थानिक कलाकारांची एकजूट, प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद आणि नाट्य परिषदेची संघटीत मेहनत, या सर्वांचा संगम या यशोगाथेत दिसून आला.