
चिपळूण : “लोकनेते स्व. बाळासाहेब माटे यांच्या दानशूरतेचा, निःस्वार्थ सामाजिक कार्याचा वारसा त्यांच्या सुपुत्रांनी पुढे नेला आहे. राजकीय लाभाची अपेक्षा न ठेवता, वडिलांप्रमाणे समाजासाठी अविरत कार्य करणारे डॉ. विजयशेठ माटे हे खर्या अर्थाने 'माटे' कुटुंबाचा सामाजिक चेहरा आहेत,” अशा शब्दांत आमदार शेखर निकम यांनी डॉ. विजयशेठ माटे यांच्या कार्याचे कौतुक केले. बाळासाहेब माटे सामाजिक प्रतिष्ठान, कामथे संचलित कै. कुंदाताई स्मृती अन्नछत्राच्या शुभारंभप्रसंगी आमदार निकम बोलत होते. विजय मेडिकलसमोर, शिवनदी शेजारी, संपूर्ण श्रावण मासभर चालणाऱ्या या अन्नछत्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कै. कुंदाताई, कै. लक्ष्मीबाई आणि स्व. बाळासाहेब माटे यांच्या स्मरणार्थ हे अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे.
स्व. बाळासाहेब माटे यांची लाडकी मुलगी कुंदाताई यांचे रुग्णांप्रती असलेले आपुलकीचे वर्तन, दररोज रुग्णांना दिला जाणारा घरगुती डबा, या दानशूरतेचे स्मरण आजही चिपळवकरांच्या मनात जिवंत आहे. त्यांच्या निधनानंतर स्व. बाळशेठ माटे यांनी श्रावण महिन्यात अन्नछत्र सुरू केले. त्यानंतर आता डॉ. विजयशेठ माटे या कार्याला पुढे नेत आहेत.
कार्यक्रमात डॉ. माटे म्हणाले, “आबा व माई यांचे स्वप्न पूर्ण करणे, हाच आमचा हेतू आहे. हे अन्नछत्र ही त्यांची आठवण जपणारी सामाजिक सेवा आहे.” तसेच अन्नछत्र श्रावण महिन्यात सकाळी ११ ते १ या वेळेत सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल, माजी अध्यक्ष सतीशआप्पा खेडेकर, भाजपचे रामदास राणे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी, राणी महाडिक, खेर्डीच्या माजी सरपंच जयश्री खताते, माजी उपसभापती सूर्यकांत खेतले, माजी सभापती दिलीप माटे, दादा खातू, मनोज जाधव, प्रदीप उदेक, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपशेठ माटे, उदय ओतरी, क्रीडाईचे राजेश जाधव, जगदीश वागदुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मोहनशेठ मिरगल यांनी स्व. बाळशेठ माटे यांचा विशेष उल्लेख करताना सांगितले की, “त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आहोत. विजयशेठ आक्रमक नसले, तरी ते त्याच ताकदीने काम करत आहेत, कुठलीही प्रसिद्धी न करता.”
कार्यक्रमादरम्यान मोहनशेठ मिरगल व दादा खातू यांनी आमदार शेखर निकम यांना मंत्रिपद मिळावे, अशा शुभेच्छा चिपळूणकरांच्या वतीने दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती यादव यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. गोगावले यांनी मानले. कार्यक्रमाला विविध सामाजिक, राजकीय व व्यावसायिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.