
चिपळूण : पालवण येथील १०६ वर्षांचे ज्येष्ठ ग्रामस्थ आणि बैलगाडी व्यावसायिक धोंडबाराव रामराव सुर्वे यांचे काल (२५ जुलै) दुपारी वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या जाण्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांची अंत्ययात्रा आज (२६ जुलै) सकाळी १० वाजता त्यांच्या पालवण येथील राहत्या घरातून निघेल. धोंडबाराव सुर्वे यांचा बैलगाडीचा व्यवसाय एकेकाळी पंचकोशी परिसरात अत्यंत प्रसिद्ध होता. ज्यावेळी वाहनांची सुविधा नव्हती, त्या काळात ते प्रवाशांना चिपळूण व गोवळकोट धक्क्यावर पोहोचवण्याचे काम आपल्या बैलगाडीतून करीत असत. विशेष म्हणजे, मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी गोवळकोट धक्क्यावरून त्यांच्या गावापर्यंत पोहोचवण्याची सेवा त्यांनी अनेक वर्षे केली होती.
चिपळूण नगर परिषदेची सध्याची जी इमारत आहे, तिच्या उभारणीसाठी लागणारी वाळू वाहतूक करण्यासाठी त्यांची बैलगाडी नगरपरिषदेने भाड्याने घेतल्याचा उल्लेख आजही जुन्या आठवणींमध्ये होतो. धोंडबाराव यांचा १०६ वा वाढदिवस कुटुंबीयांनी ३ फेब्रुवारी रोजी साजरा केला होता, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरते. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, एक मुलगी, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने एक अनुभवसंपन्न, कष्टाळू पिढी काळाच्या पडद्याआड गेली असून, पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.