शिष्यवृत्तीच्या जिल्हा गुणवत्ता यादीत सह्याद्री आघाडीवर

आमदार शेखर निकम यांनी केले कौतुक
Edited by: मनोज पवार
Published on: July 24, 2025 10:53 AM
views 142  views

सावर्डे : विद्यार्थ्यांच्या मध्ये गुणात्मक दर्जा वाढीबरोबरच संस्कारक्षम पिढी निर्माण करणे ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर राहून उज्वल भविष्यासाठी विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन करावे व आपल्या आई-वडिलांसह सह्याद्रीचे नाव उज्वल करावे यासाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य सह्याद्री कडून नेहमी केले जाईल असे प्रतिपादन आमदार शेखरजी निकम यांनी याप्रसंगी केले.

कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर  असणाऱ्या सह्याद्री शिक्षण संस्थाच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी अविरत प्रयत्न करत असून यावर्षीच्या शिष्यवृत्तीच्या जिल्हा गुणवत्ता यादीत सह्याद्री शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन करून अग्रक्रम प्राप्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नियमितपणे विविध उपक्रम राबवणारी ही अग्रगण्य संस्था असून त्यासाठी सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. 

नुकत्याच जाहीर झालेल्या पूर्व प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सह्याद्रीच्या न्यू इंग्लिश स्कूल सती चिंचघरी विद्यालयाच्या दक्ष गिजये या विद्यार्थ्याने राज्य गुणवत्ता यादीत 14 वा क्रमांक प्राप्त करून सह्याद्रीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज सती चिंचगरी दस्तुरी या विद्यालयाचे 17 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले असून जिल्ह्यात पहिला क्रमांक प्राप्त करणारे हे विद्यालय ठरले आहे. इंग्लिश मीडियम स्कूलचे पाच, गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सात, न्यू इंग्लिश स्कूल उभळे एक व धोंडीरामशेठ दाभोळकर इंग्लिश मीडियम स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केले आहे.

या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप देण्यासाठी नुकताच सह्याद्रीच्या सभागृहात गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.त्याप्रसंगी आमदार शेखर निकम यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याचे कार्य सह्याद्रीच्या हातून घडत असल्याने समाधान व्यक्त केले. उपस्थित पालकांनीही सह्याद्रीच्या वतीने आयोजित केलेल्या  कौतुक सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त केला  याप्रसंगी आमदार शेखर निकम,सचिव महेश महाडिक, युवा नेते अनिरुद्ध निकम,प्रसिद्ध अभिनेते प्रभाकर मोरे, पालक, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. यश संपादन करणारे विद्यार्थी पालक व शिक्षकांचा गौरव करताना कार्याध्यक्ष शेखरजी निकम व मान्यवर