
शिरळ : दिनांक २१ जून रोजी जागतिक योग दिनाचा उत्सव विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल शिरळ गुरुकुलमध्ये उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात पार पडला. सकाळी सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन योगसाधना केली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. सूर्यनमस्कार, विविध योगासने आणि ११ ओंकार असे सादरीकरण झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कोकणसाद वृत्तपत्राचे मनोज पवार होते तर शालेय समितीचे सेक्रेटरी श्री. संजय सोहनी यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. विद्यार्थ्यांनी योग प्रदर्शन सादर करून कार्यक्रमात चैतन्य निर्माण केले.
सादरीकरण झाल्यावर इयत्ता आठवीतील विद्यार्थी रुद्र पुराणिक याने योग दिनाचे महत्व आणि फायदे सांगितले. आज योग दिनासोबत भूगोल दिन सुद्धा असल्याने भूगोल शिक्षिका सौ.सिद्धी जाधव यांनी भूगोल दिन का साजरा केला जातो आणि त्याचे महत्व याचे मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे मनोज पवार यांनी आपली संस्कृती यामध्ये योग किती महत्वाचा आहे हे सांगितले तर श्री.संजयजी सोहनी यांनी योगाचे महत्व सांगितले. दोन्ही मान्यवरांनी मुलांशी संवाद साधला आणि मुलांचे कौतुकही केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सहावी मधील विद्यार्थिनी कु.श्रुतिका योगेश शिगवण हिने केले होते. या कार्यक्रमासाठी गुरुकुल प्रबंधक श्री.मोहन भिडे, मुख्याध्यापिका जान्हवी टाकळे यांस बरोबर रोहन सिनकर,केतकी मुसळे, गजानन गुणिजन सुश्रुत चितळे व आदित्य तांबे हे शिक्षक उपस्थित होते. योग दिनाचे हे आयोजन गुरुकुलच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला साजेसे ठरले, यामुळे सगळ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.