
चिपळूण : ‘हायटेक'च्या धर्तीवर बांधण्यात येत असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाचा पहिल्या स्लॅबचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित बांधकाम कित्येक महिन्यापासून रखडलेल्या स्थितीत आहे. विशेष म्हणजे मध्यवर्ती बसस्थानकानंतर सुरु झालेल्या रत्नागिरीतील बसस्थानक पूर्णत्वास जाऊन त्यांच्या उद्घाटना नारळ सुद्धा फुटला. मात्र, येथील आगाराच्या स्थितीबाबत नागरिकांतून आगार प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहेत.
येथील मध्यवर्ती बसस्थानकाची जीर्ण इमारत तोडून त्या जागी हायटेक धर्तीवर बसस्थानक बांधण्याच्या कामास काही वर्षापूर्वी प्रारंभ झाला. मात्र ठेकेदार व एसटी महामंडळाच्या कुचकामी भूमिकेमुळे या बांधकामाचा सुरुवातीपासून बट्ट्याबोळ उडाला. यामुळे कीत्येक वर्षे होऊनही बसस्थानकाचा पायादेखील पूर्णत्वास गेलेला नव्हता. यामुळे प्रवाशांसह चिपळूणवासियांच्या प्रखर मागणी नंतर जाग आलेल्या एस.टी. महामंडळाने त्यावेळच्या ठेकेदाराचा ठेका काढून त्याजागी नव्या ठेकेदाराची नियुक्ती केली. नव्या ठेकेदाराने पायासह पिलर तर पहिल्या स्लॅबचे काम पूर्ण केले. यानंतर मात्र पुढील कामास या ठेकेदाराकडून पतिसाद न मिळाल्याने अखेर उर्वरित बांधकामही अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्थितीत आहे. बसस्थानकाच्या उर्वरित कामासाठी 2 कोटी मंजूर असून त्याची निविदा प्रकिया पूर्ण झाली आहे. मात्र त्याच्या कामाचे आदेश कधी दिले जाणार याची प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे सात वर्षापूर्वी मध्यवर्ती बसस्थानकाच्या बांधकामाला प्रारंभ झाला. त्यानंतर रत्नागिरी बसस्थानकाचा प्रारंभ झाला. असे असताना रत्नागिरीतील बसस्थानक पूर्णत्वास गेले. मात्र चिपळूण मध्यवर्ती बसस्थानक अद्यापही रखडलेल्या स्थितीत आहे.
आता दोन आठवड्यानंतर पुन्हा पावसाळी हंगाम सुरू होणार असून या कलावधीत रखडलेल्या बांधकामाचा प्रश्न मार्गी लागणार की जैसे थे राहणार असा सवाल प्रवाशांतून उपस्थित होत आहे.