
चिपळूण : शतकोत्तर परंपरा जपणाऱ्या, शहराला कोकणच्या सांस्कृतिक राजधानीचा दर्जा प्राप्त करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर’ संस्थेने आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला नुकतेच नवी दिल्ली येथील संमेलनात निवेदन दिले आहे. विशेष म्हणजे ११ ते १३ जानेवारी २०१३ दरम्यान संपन्न झालेल्या ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन याच संस्थेने यशस्वी केले होते. चिपळूणच्या २०१३च्या संमेलनाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात नवा ‘लँडमार्क’ सेट केल्याचे बोलले जाते.
‘लोटिस्मा’ ही निस्पृह कार्यकर्त्यांचे बळ लाभलेली, संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील जिज्ञासूंमध्ये चिपळूणची ओळख सांगणारी, इथल्या श्रोत्यांना सजग आणि बहूश्रुत बनवून शहराचे सामाजिक भान उत्तम विकसित करण्यात महत्वाची भूमिका बजावणारी संस्था म्हणून परिचित आहे. वाचनालयातर्फे सातत्याने नवनवीन उपक्रम सुरु असतात. त्यामुळे दर्दी लोकं वाचनालयाला वारंवार भेट देत असतात. चिपळूणकरांना उत्तमोत्तम ग्रंथांची उपलब्धी, देशभरातील दिग्गजांच्या व्याख्यानांची मेजवानी, ज्ञानवर्धक कार्यक्रम, पुस्तक प्रकाशाने, जवळपास सर्व प्रकारची साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन ‘लोटिस्मा’ने केले आहे. सर्व सुजाण संचालकांचे आणि कर्मचाऱ्यांच्या खंबीर पाठबळावर वाचनालय आज समृद्ध स्वरूप अनुभवते आहे. या वाचनालयातर्फे दरवर्षी सुमारे पंचवीसेक पुरस्कार ‘साहित्य-समाज-संस्कृती’नुरूप उल्लेखनीयकाम करणाऱ्या व्यक्तींना दिले जातात. महाराष्ट्रात हे सारे पुरस्कार भूषणावह मानले जातात. कोकणाला स्वतःच्या आत्मविश्वासाची जाणीव करून देणारे, समाज साहाय्यातून सुमारे एक कोटी रुपये खर्च करून उभारले गेलेले ‘वस्तूसंग्रहालय आणि कलादालन’ हे वाचनालयाचे दोनही भव्यदिव्य प्रकल्प आवर्जून भेट देऊन पाहावेत, पुढील पिढीला समजून सांगावेत इतके महत्वाचे आहेत. चिपळूणच्या ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले होते. ज्येष्ठ नेते खा. शरद पवार हे संमेलनाचे उदघाटक व स्वागताध्यक्ष खा. सुनील तटकरे होते.
दरम्यान, आगामी संमेलन निमंत्रण पत्र वाचनालयाच्या पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष अरुण इंगवले, मसापच्या चिपळूण शाखेचे अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे आणि वाचनालयाचे संचालक धीरज वाटेकर यांनी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांना सपूर्द केले. संमेलन आयोजनासाठी चिपळूणसह सातारा, इचलकरंजी, औदुंबर याही ठिकाणाचे निमंत्रणे महामंडळाला प्राप्त झाली आहेत.