
चिपळूण : उरण येथील यशश्री शिंदे हिला न्याय मिळण्याबरोबरच तिच्या हत्येविरोधात निषेध मोर्चा सुरू असताना एका महिलेने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच मंदिरातील पुजाऱ्यांकडून असह्य महिलेवर झालेल्या अमानुष अत्याचाराविरोधात चिपळूण व्यापारी महासंघटनेने कडकडीत बंद पाळत चिपळूण नगरपरिषद ते प्रांत कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढून या संदर्भातील निवेदन प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्याकडे दिले. मोर्चेदरम्यान व्यापाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.
या निवेदनानुसार गेल्या काही दिवसांपूर्वी उरण येथील तरुणी यशश्री शिंदे हिची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. या खुन्याची विकृत माणुसकीता दिसत असून त्याला कडक शासन होण्यासंदर्भात सरकारने योग्य पाठपुरावा करावा, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच यशश्री शिंदे हिच्या हत्येविरोधात निषेध म्हणून चिपळूण येथे गुरुवारी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी एका महिला भगिनीने अश्लील अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तरी याप्रकरणाची चौकशी व्हावी. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी एका मंदिरातील पुजाऱ्यांकडून महिलेवरती अमानुष अत्याचार झाले. त्या नराधमांना कट्टर शासन होऊन महिलेला योग्य न्याय मिळावा, अशी मागणी चिपळूण व्यापारी महासंघटनेतर्फे या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी चिपळूण व्यापारी महासंघटनेचे किशोर रेडीज, उदय ओतारी, सूर्यकांत चिपळूणकर, अभिनव भुरण, हेमंत शिरगावकर, संदेश भालेकर, परिमल भोसले, अरुण भोजने शेकडो व्यापारी उपस्थित होते. यावेळी किशोर रेडीज व उदय ओतारी यांनी महिलांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत तीव्र संताप व्यक्त करतांना आरोपींना कडक शासन झाले आहे. सदरील खटले फास्ट ट्रॅकवर चालले पाहिजेत, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली.
यावेळी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्यासह पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
उरण येथील यशश्री शिंदे हिच्या हत्येच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठ संघटनेतर्फे गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. तर तात्काळ संध्याकाळी व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन शुक्रवारी चिपळूण बंदचे आवाहन केले. यानुसार शुक्रवारी चिपळूण बाजारपेठेत पूर्ण कडकडीत बंद पाळण्यात आला. एकंदरीतच सर्वच व्यवहार ठप्प झाल्याचे पहावयास मिळाले. रिक्षा संघटना देखील या बंदात सहभागी झाली होती, तशी माहिती रिक्षा संघटनेचे दिलीप खेतले यांनी दिली.