
चिपळूण : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे इंग्रजी भाषा क्लबच्या वतीने “मेरी क्युरीची जीवनकथा” या विषयावर प्रेरणादायी कथाकथन सत्राचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या भाऊसाहेब महाडिक सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती लिबेने केले. प्रमुख पाहुणे प्रा. निलेशकुमार यादव यांचे स्वागत विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका सौ. शिल्पा राजेशिर्के यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
प्रा. यादव यांनी आपल्या प्रभावी कथाकथनातून महान शास्त्रज्ञ मेरी क्युरी यांच्या अद्भुत जीवनप्रवासाचा आढावा घेतला. त्यांच्या चिकाटी, समर्पण आणि विज्ञानातील असामान्य योगदानाचे उदाहरण विद्यार्थ्यांसमोर ठेवत त्यांनी ज्ञानार्जनात दृढनिश्चय आणि कुतूहलाचे महत्त्व अधोरेखित केले.
या सत्रात इयत्ता आठवी ते दहावीतील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी इंग्रजी भाषा क्लबच्या सदस्याने आभारप्रदर्शन केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी ठरला असून, इंग्रजी भाषेचे ज्ञान वाढविण्यास तसेच कथाकथन कौशल्य विकसित करण्यास सहाय्यभूत ठरला. विद्यालयाच्या इंग्रजी विद्यार्थी समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या प्रेरणादायी कार्यक्रमाचे विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे आयोजन नारायण कालप यांनी इंग्रजी विषय शिक्षकांच्या सहकार्याने केले.










