
चिपळूण : “सूत्रसंचालन, निवेदन, मुलाखतकार, उद्घोषक या क्षेत्रात निश्चितच व्यवसाय म्हणून शंभर टक्के यशस्वी होऊ शकतात. मात्र, हे क्षेत्र आपल्या आयुष्याचा पूर्णवेळ व्यवसाय बनवायचा असेल, तर त्यामागे सातत्य, अभ्यास आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान आवश्यक आहे. स्पर्धा नक्की आहे, पण आपण तयारी केली, तंत्र आत्मसात केलं, तर या क्षेत्रातही सहज यश मिळवता येतं,” असा विश्वास ज्येष्ठ अभिनेते, प्रसिद्ध सूत्रसंचालक व निवेदक विघ्नेश जोशी यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय नाट्य परिषद, शाखा चिपळूण यांच्या वतीने शहरातील बांदल हायस्कूलच्या सभागृहात ‘सूत्रसंचालन व निवेदन कार्यशाळेचे’ आयोजन रविवारी करण्यात आले होते. या कार्यशाळेला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल ४० हून अधिक प्रशिक्षणार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजनाने झाली. या वेळी विघ्नेश जोशी यांच्यासह कवी प्रमोद जोशी, नाट्य परिषद शाखा चिपळूणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, सचिव डॉ. मीनल ओक, उपाध्यक्ष योगेश बांडागळे, संचालिका मनीषा दामले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक करताना डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी “असा अनुभवी आणि ज्ञानी मार्गदर्शक लाभल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कोणत्याही कार्यक्रमाच्या यशात सूत्रसंचालकाचा वाटा महत्त्वाचा असतो, त्यामुळे ही कार्यशाळा सर्वांसाठी उपयुक्त ठरेल,” असे सांगितले.
कवी प्रमोद जोशी यांनी आपल्या समर्पक कवितेद्वारे विघ्नेश जोशी यांच्या सूत्रसंचालक, निवेदक आणि अभिनेता म्हणूनच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. मान्यवरांचा परिचय संगीता जोशी यांनी करून दिला. विघ्नेश जोशी यांनी आपल्या सत्रात सूत्रसंचालन, निवेदन आणि मुलाखतकार म्हणून कार्य करताना येणाऱ्या विविध परिस्थितींविषयी अनुभव सांगितले. “सूत्रसंचालक हा केवळ वक्ता नसून, तो संवादाचा पूल असतो. त्याच्यात निरीक्षणशक्ती, शब्दांची जाण आणि मंचावरची समज असावी,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी १०० हून अधिक मुलाखती घेतल्या आणि ४०० पेक्षा अधिक कार्यक्रमांत सूत्रसंचालन केलेल्या अनुभवातून सहभागींचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता जोशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंगेश बापट यांनी मानले. कार्यशाळेच्या यशासाठी श्रीकांत फाटक, ॲड. विभावरी रजपूत, मंदार ओक, मंगेश बापट, संजय सरदेसाई, छाया पोटे, अपर्णा नातू आणि नाट्य परिषदेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.










