सावर्डे विद्यालयात दाखल्यांसाठी शिबिर

Edited by: मनोज पवार
Published on: October 03, 2025 11:38 AM
views 103  views

सावर्डे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या महास्वराज्य अभियान टप्पा क्रमांक तीन अंतर्गत सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत “शाळा तिथे दाखला” या शासनाच्या उपक्रमाला सावर्डे परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तहसील कार्यालय चिपळूण आणि महा-ई-सेवा केंद्र संचालिका सानिका राणे यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नुकतेच दाखले शिबिर आयोजित करण्यात आले. ग्रामीण भागातील पालकांना आवश्यक दाखले मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात वारंवार धावपळ करावी लागू नये, यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरले. या शिबिरात एकूण ७५ दाखल्यांची नोंद करण्यात आली.

कार्यक्रमाला मंडळ अधिकारी अनिल जाधव, सजा तलाठी उतेकर, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, महा-ई-सेवा केंद्र संचालिका सानिका राणे, सहाय्यक गणेश पाटोळे यांच्यासह पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मंडळ अधिकारी अनिल जाधव यांनी शासनाच्या या योजनेबाबत पालकांना माहिती देत जास्तीत जास्त पालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. प्राचार्य राजेंद्र वारे यांनी ग्रामीण भागातील पालकांची गैरसोय टाळण्यासाठी घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी आवश्यक दाखले वेळेत मिळवून त्यांचे जतन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पालकांनी शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. शाळेच्या वतीने पालकांना सातत्याने सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.