चिपळुणात ४ ते ६ ऑक्टोबरदरम्यान ‘संगीत नाट्यमहोत्सव’

संगीत नाट्यप्रेमींसाठी पर्वणी
Edited by: मनोज पवार
Published on: October 01, 2025 18:02 PM
views 74  views

चिपळूण : कोकणातल्या सुप्त कलागुणांची दखल अनेकदा त्यांच्या राज्यव्यापी यशानंतरच घेतली जाते. अगदी तसेच, गुहागर तालुक्यातील वाघांबे गावच्या ‘परस्पर सहाय्यक मंडळ - वाघांबे (मुंबई)’ या संस्थेने आपल्या सातत्यपूर्ण गुणवत्तेच्या जोरावर राज्यस्तरीय संगीत नाटक स्पर्धांमध्ये सलग चार वर्षं उत्तुंग यश मिळवल्यानंतर, त्यांचा चतुरंग प्रतिष्ठान तर्फे कोकणातच जाहीर सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या गौरवाच्या निमित्ताने, चिपळूणमध्ये ४ ते ६ ऑक्टोबरदरम्यान ‘संगीत नाट्यमहोत्सव’चं आयोजन करण्यात आलं आहे. ही आनंदवार्ता म्हणजे कोकणातील नाट्यरसिकांसाठी एक पर्वणीच आहे. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे रात्री ९ वाजता (५ ऑक्टोबर रोजी ८.३० वा.) दररोज एक संगीत नाटक सादर होणार आहे. विशेष म्हणजे, यामध्ये ‘संगीत सुवर्णतुला (२०२२)’, ‘संगीत मंदारमाला (२०२३)’, ‘संगीत जय जय गौरीशंकर (२०२४)’ या सलग प्रथम क्रमांक प्राप्त नाटकांचा आणि ‘संगीत बावनखणी (२०२५)’ या द्वितीय क्रमांकाच्या नाटकाचा समावेश आहे.

राज्यभरात नाव कमावलेल्या या कलावंतांचा सन्मान सोहळा रविवार, ५ ऑक्टोबर रोजी ‘संगीत जय जय गौरीशंकर’ या नाटकाच्या मध्यंतरात साजरा होणार असून, त्या दिवशी नाटकाचा आरंभ रात्रौ ८.३० वाजता होईल. या सोहळ्यासाठी ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक आणि ज्येष्ठ दिग्दर्शक श्री. विजय केंकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या तीन दिवसीय नाट्यमहोत्सवात एक विशेष आकर्षण ठरणार आहे ते म्हणजे – ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ या संगीत नाटकाचा प्रयोग. अभिराम भडकमकर लिखित आणि हृषिकेश जोशी दिग्दर्शित या नाटकात, संगीत नाटकाच्या सुवर्णकाळातील ‘संयुक्त मानापमान’ या ऐतिहासिक प्रयोगावर आधुनिक भाष्य करण्यात आलं आहे. ६ ऑक्टोबर रोजी, कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने हा प्रयोग ‘मसाला दूध’ वाटपासह साजरा केला जाणार आहे.

या नाट्यप्रयोगांची प्रवेशिकांची ऑनलाईन व फोन बुकिंग सुविधा खुली असून, प्रयोगाच्या तीन दिवस आधीपासून थेट थिएटरवरही प्रवेशिका उपलब्ध राहतील. प्रतिष्ठानच्या म्हणण्यानुसार, सहप्रायोजक स्वामी स्वरूपानंद पतसंस्था, सारस्वत बँक आणि Fine Envirotech Engineers यांच्या सहकार्यामुळे अत्यंत नाममात्र शुल्क ठेवण्यात आले असून, नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.