
दापोली : जमीनही गेली आणि नोकरी ही नाही अशी अवस्था दापोली तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची झाली आहे. विद्यापीठाच्या सेवेत अनेक वर्ष कित्येक प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत. कुणी १० वर्ष तर कुणी १२ वर्ष तर कुणी १७ वर्ष या विद्यापीठात राबत आहेत. प्रकल्पग्रस्त म्हणून विद्यापीठाने संपादित केलेल्या जागेतून नोकरी मिळेल अशी आस लावून हे शेतकरी बसले होते.
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने जाहीर केलेल्या कर्मचारी भरतीच्या जाहिरातीत विद्यापीठ सेवेत असणाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल असे स्पष्ट म्हटले होते. त्यामुळे आपला वनवास संपेल असे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाटले होते. मात्र तसे न करता इतकी वर्षे राबलेल्या लोकांना विद्यापीठाने दूर ठेवत नवखे उमेदवार ज्यांना विद्यापीठाच्या कामाचा अनुभव नाही, अशांना विद्यापीठ सेवेत सामावून घेतले आहे, असा आक्षेप प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी घेतला असून आमच्यावर अन्याय का? केला असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
दापोली तालुक्यातील जवळपास ४० प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर यांची भेट घेऊन नोकरीत सामावून घ्या अशी विनंती केली. जर नोकरीत सामावून घेत नसाल तर आमच्या संपादित केलेल्या जमिनी परत करा त्या जमिनीत शेती करून आम्ही पोट भरू, अशी प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी विद्यापीठ कुलसचिव यांच्याकडे मागणी केली. या वेळी कुलसचिव यांनी प्रकल्पग्रस्त उमेदवारांना थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेली.
या प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या बाजूने शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष उभा राहिला असून पक्षाचे तालुका प्रमुख ऋषीकेश गुजर,सचिव नरेंद्र करमरकर आधी पदाधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांना सेवेत सामावून घ्या अशी मागणी करत,जर या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा विचार झाला नाही तर शेतकरी त्यांचे कुटुंबीय यांना घेऊन आंदोलन उभं करू असा विनंती वजा इशारा दिला आहे. विद्यापीठ सेवेत कुणाला सामावून घ्यावे कुणाला नाही हे जर राजकीय पुढाऱ्यांच्या घरी ठरत असेल तर ते खपवून घेणार नाही.त्यात तुमचा एक अधिकारी देखील सामील आहे असे यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बाजू मांडताना गुजर यांनी सांगितले. त्यामुळे कोकण कृषी विदयापीठ कर्मचारी भरती प्रक्रिया हे प्रकरण भविष्यात उग्र रूप धरेल अशी शक्यता आहे.
दापोली कोकण कृषी विद्यापीठात सेवेत सामावून घेत असलेले उमेदवार याना विद्यापीठ कामाचा किती अनुभव आहे.असे कुलसचिव यांना विचारले असता त्यानी दिलेले आय डोन्ट नो हे उत्तर विद्यापीठाला शोभनिय नाही.या बाबत आदित्य ठाकरे यांना दापोली कोकण कृषी विद्यापीठात बोलावून आंदोलन उभं करू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दापोली तालुका प्रमुख हृषीकेश गुजर यांनी दिला आहे.
नोकर भरती प्रक्रियेत कृषी विद्यापीठाच्या सेवेत ज्यांचा समावेश झालेला नाही, त्या संदर्भात झालेल्या चर्चेची माहिती आपण कुलगरु डॉ. संजय भावे यांना देऊ अशी माहिती कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर यांनी दिली आहे.










