
सावर्डे : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी मोठ्या उत्साहात पार पडली. दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या या उपक्रमाचा लाभ इयत्ता ५ वी ते १० वीपर्यंतच्या एकूण १२०५ विद्यार्थ्यांना झाला.
ही तपासणी बाळासाहेब माटे कुटीर रुग्णालय, कामथे येथील डॉ. दर्शन खोत यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यांच्यासोबत डॉ. अमोल दामोदर, डॉ. देवानंद खिलारे, डॉ. धीरज गवई, डॉ. प्रज्ञा नरवाडे, सीएचओ स्वाती सालवाड, सीएचओ पुनम घुगे, आरोग्य सहाय्यक प्रफुल्ल केळसकर, एएनएम दिपाली जाधव, एएनएम दर्शना भोपळे तसेच सावर्डे केंद्रातील आशा सेविका उपस्थित होत्या.
सर्दी, खोकला, ताप आदी लहानशा आजारांनी त्रस्त विद्यार्थ्यांना औषधोपचार करण्यात आले. तर गंभीर आजाराच्या लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. दर्शन खोत यांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले, तर डॉ. प्रज्ञा नरवाडे यांनी विशेषत: विद्यार्थिनींशी संवाद साधून आरोग्यविषयक माहिती दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे व उपमुख्याध्यापक विजय चव्हाण यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. क्रीडा शिक्षक दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगाव, प्रशांत सकपाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
या आरोग्य तपासणी उपक्रमात सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत दक्षता घेतल्याबद्दल पालकांनी विद्यालयाचे मनःपूर्वक कौतुक केले.










