
चिपळूण : प्रथितयश प्रकाशिका कै. सौ. अंजली रवींद्र घाटपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साहित्यविश्वात मानाचा समजला जाणारा ‘स्नेहांजली पुरस्कार’ प्रतिवर्षी ‘स्नेहल प्रकाशन’च्या वतीने देण्यात येतो. सन २०२५ हे पुरस्काराचे २३वे वर्ष असून यंदा हा सन्मान चिपळूण येथील संपादक, लेखक, कवी व थोर सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. प्रकाश देशपांडे यांना देण्यात येणार आहे.
स्नेहांजली पुरस्कार सोहळा सोमवार, ६ ऑक्टोबर २०२५, रोजी सायंकाळी ६.०० वाजता एस. एम. जोशी सभागृह, पुणे-३० येथे संपन्न होणार आहे. या समारंभाचे अध्यक्षत्व मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर करणार आहेत. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भा. ज. पा. महाराष्ट्र राज्य मा. माधव भांडारी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात श्री. आशुतोष बापट लिखित ‘साद मंदिरांची ओळख संस्कृतीची’ आणि श्रीमती वसुधा परांजपे लिखित ‘स्वराज्याच्या सौदामिनी’ या दोन पुस्तकांचेही प्रकाशन होणार आहे.
स्नेहांजली पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलूरकर असून या समितीमध्ये डॉ. मुकुंद दातार, प्र. के. घाणेकर, आशुतोष बापट, अभय भावे आणि रवींद्र घाटपांडे यांचा समावेश आहे. समितीने एकमताने मा. श्री. प्रकाश देशपांडे यांची निवड केली आहे. मा. प्रकाश देशपांडे हे चिपळूण येथील सुप्रसिद्ध साहित्यिक असून गेल्या ४० वर्षांपासून साहित्य व सामाजिक क्षेत्रात तन-मन-धनाने योगदान देत आहेत. त्यांनी चिपळूण येथे साहित्य संमेलन आणि नाट्य संमेलन यशस्वीपणे आयोजित केले आहेत. तसेच त्यांनी अथक परिश्रमाने प्राचीन वस्तूंचे म्युझियम उभारले आहे.
संपादक, लेखक आणि कवी म्हणूनही देशपांडे यांचा उल्लेखनीय कार्य आहे. सध्या ते कोकण रत्ने या ग्रंथावर काम करत आहेत, तर त्वदियाय कार्याय हा गौरवग्रंथ त्यांच्यावर प्रकाशित झाला आहे. देशपांडे हे उत्तम व्याख्याते असून त्यांनी विविध विषयांवर अनेक व्याख्याने दिलेली आहेत. एका अर्थाने चिपळूणच्या ‘सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक’ म्हणून त्यांची ओळख आहे. ते साहित्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्यदेखील आहेत.
‘स्नेहांजली पुरस्कार’ आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक सुप्रसिद्ध दिग्गज लेखक-लेखिकांनी स्वीकारला आहे. यापूर्वी या पुरस्काराचे मान्यवर प्राप्तकर्ते होते, उदा. मा. शेषराव मोरे, डॉ. वि. रा. करन्दीकर, डॉ. भीमराव गस्ती, डॉ. गो. बं. देगलूरकर, श्री. गिरीश प्रभुणे, डॉ. सदानंद मोरे, श्री. श्याम भुर्के इत्यादीनी हा पुरस्कार स्वीकारला आहे.










