युती झाली तर ठीक, नाही झाली तरी स्वबळावर सज्ज

हातीव - मोर्डे पंचायत समिती गणाच्या मेळाव्यात आ. शेखर निकम यांचा इशारा
Edited by: मनोज पवार
Published on: September 14, 2025 19:44 PM
views 54  views

देवरुख : लोकसभा व विधानसभा निवडणुका पार पडल्या असून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर हातीव-मोर्डे पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी सकाळी वांझोळे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट संदेश दिला की, महायुती झाली तर सन्मानाने जागांचा तोडगा निघावा, आम्हाला आमच्या हक्काच्या जागा मिळाल्या पाहिजेत, आम्हाला कमी लेखले जाऊ नये. मात्र युती झाली नाही, तरी स्वबळावर लढण्याची आमची ताकद आहे आणि त्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे.

या मेळाव्यात हातीव-मोर्डे पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे प्रामाणिक आणि सर्वसामान्य घरातून पुढे आलेले कार्यकर्ते मंगेश बांडागळे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी एकमुखाने केली. हुसेन बोबडे, निधी पंदेरे, अनंत जाधव, संतोष अणेराव यांच्यासह अनेकांनी या मागणीला जोरदार पाठींबा दिला. प्रास्ताविक करताना प्रदीप कांबळे यांनी जिल्हा परिषदेच्या तिन्ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास त्या जिंकून आणण्याचा विश्वास व्यक्त केला. “मंगेश बांडागळे हे कष्टाळू आणि प्रामाणिक नेतृत्व आहे. अशा कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात मागणी मांडली.

मेळाव्याच्या सुरुवातीला माजी सभापती पूजाताई निकम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला, तर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मंगेश बांडागळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या मेळाव्याला जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, माजी सभापती पूजाताई निकम, राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य जयंद्रथ खताते, विधानसभा क्षेत्राध्यक्ष रमेश राणे, माजी सभापती विजय आप्पा गुजर, तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, हनीफशेठ हरचरकर, बाळुशेठ ढवळे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष झाकीर शेकासन, पंकज कुसाळकर, सुशील भायजे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा मानसी करंबळे, बाळा पंदेरे, वांझेळेच्या सरपंच निधी पंदेरे, तुषार चव्हाण, प्रमोद महाजन, नितीन भोसले, राजू सुतार, उदय सावंत, संतोष अणेराव, हुसेन बोबडे, उस्मान साटविलकर, अनंत जाधव, संतोष गोताड, परशुराम चोगले, गजानन गुरव, दत्ताराम चव्हाण, विनायक वाजे, विनायक गुरव, राजाभाऊ चव्हाण, भाऊ शेडगे, बाबा पंदेरे, शांताराम सनगले, नंदू सावंत, विजय भुवड, प्रतीक साळवी, कृष्णा कदम, मानसी करंबळे, चंद्रकांत जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार शेखर निकम म्हणाले की, ३०२९च्या विधानसभा निवडणुकीचा विचार करू नका, आपलं काम करत राहा. आता युती होईल की नाही, हे आता सांगता येत नाही, झाली तर ठीकच, पण नाही झाली तरी आपण स्वबळावर लढण्याची तयारी ठेवू या. मंगेश बांडागळे यांच्या उमेदवारीचा आग्रह सर्वांनी धरला आहे. मंगेश हा एक सामान्य कार्यकर्ता असून सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सातत्याने काम करतो आहे. त्याच्यासाठी मी पक्षाकडे नक्कीच शब्द टाकेन. माझ्या सुरुवातीपासून तू माझ्यासोबत निष्ठेने उभा आहे. 

आमदारांनी या वेळी मार्लेश्वर, टिकलेश्वर यांसह या भागातील विविध विकास कामांची माहितीही उपस्थितांसमोर ठेवली. आपले मनोगत व्यक्त करताना मंगेश बांडागळे म्हणाले की, पक्ष जो उमेदवार ठरवेल, त्यासाठी मी तन-मनाने काम करेन. माझ्या नावाचा आग्रह होत आहे, याचा मला आनंद आहे, मात्र अंतिम निर्णय आमदार शेखर निकम यांचाच असेल. ते जो उमेदवार देतील, त्याच्या प्रचारासाठी मी स्वतः आघाडीवर असेन. विरोधकांविषयी बोलण्याची काही गरज नाही, कारण आमदार शेखर निकम यांनी विकास कामांमुळे त्यांचे बळ केले आहे. आपले नाणे खणखणीत आहे आणि तेच लोकांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

मेळाव्यात जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, जयंद्रथ खताते, रमेश राणे, विजयआप्पा गुजर यांनीही आपले विचार मांडले. त्यांनी या मेळाव्याचे आयोजन उत्तम केल्याबद्दल आयोजक मंगेश बांडागळे, हुसेन बोबडे, प्रदीप कांबळे, रामुशेठ पंदेरे, निलेश भुवड, बाळा पंदेरे यांचे कौतुक केले. या वेळी खेर्डीचे माजी सरपंच दशरथशेठ दाभोळकर यांनी आक्रमक भाषण करताना २०२४च्या निवडणुकीत आम्ही कमी पडलो, याची कबुली दिली. संगमेश्वर तालुक्याने आमदार शेखर निकम यांना विजयी केले म्हणून आम्ही चिपळूणमध्ये फटाके फोडू शकलो. मात्र यापुढे आम्ही गाफील राहणार नाही. मागच्या निवडणुकीपूर्वी किटल्या, छत्र्या वाटणारे, मुंबई-पुण्यातील कोकणवासीयांना बसेस देणारे लोक या वेळी कुठे होते, असा सवाल करत त्यांनी आमदार निकम म्हणजे विकासाचे दुसरे नाव असल्याचे ठामपणे सांगितले. त्यांच्या पाठीशी तन-मन-धनाने उभे राहून संगमेश्वर तालुक्यासाठी काम करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक म्हणून सुरुवात झालेला हा कार्यक्रम प्रचंड गर्दीमुळे मोठ्या मेळाव्यात परिवर्तित झाला. आयोजक मंगेश बांडागळे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या वतीने सर्व अकरा गावांतील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यांचे नतमस्तक होऊन आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप कांबळे यांनी केले, तर आभार संजय कदम यांनी मानले.