घरकुलाच्या हप्त्यासाठी दिव्यांगाची फरपट

Edited by: मनोज पवार
Published on: September 04, 2025 15:26 PM
views 269  views

संगमेश्वर : शासनाच्या घरकुल योजनेतून घरकुल प्राप्त झाले आहे. पहिले दोन हप्ते सुरळीतपणे प्राप्त झाले. कळंबस्ते साटलेवाडीतील विलास वसंत लोकरे पायाने दिव्यांग असून चालण्यात खूपच अडथळे येतात. तरीसुद्धा स्वतः खातेधारक लोकरे यांच्या घरकुलाचा शेवटचा हप्ता त्यांच्या पोस्टातील खात्यात येऊन सुद्धा संबंधित विभागातील कर्मचारी प्रत्येक वेळी वेगळी कारणे देऊन पैसे देण्याचे टाळत आहेत. आतापर्यंत तब्बल पाच वेळा  विलास लोकरे हे  फणसवणे, कसबा, संगमेश्वर येथील पोस्टात चालता येत नसून सुद्धा रिक्षाने स्वखर्चाने गेले. प्रत्येक फेरीसाठी रिक्षावाले ५०० रुपये आकारतात पण प्रत्येक वेळी त्यांना संबंधित खात्यातील लोकांनी खाते लिंक नाही, इतकी कॅश नाही, लाडक्या बहिणीच्या वाटपासाठी पैसे हवेत, नेटच नाही अशी उडवा उडवीची उत्तर देऊन पैसे देण्याचे टाळण्यात येत आहेत. स्वतःच्या हक्कासाठी दिव्यांग व्यक्तीची फरकट करून संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी काय मिळवले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या विषयात स्थानिक लोकंप्रतिनिधीनी लक्ष घालून वारंवार सरकारी कार्यालये, पोस्ट आणि बँका यात सर्वसामान्य लोकांना होणारा त्रास कमी करावा अशी मागणी होत आहे.