
चिपळूण : श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूण यांच्या वतीने माधव सभागृह, भोगाळे येथे सुरू असलेल्या गणेशोत्सवात बुधवारी रंगारंग अभिनय स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. मंडळाच्या ७४ व्या वर्षातील या गणेशोत्सवात पहिली ते पाचवी, सहावी ते दहावी आणि महाविद्यालयीन तसेच खुला गट अशा तीन विभागांमध्ये स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेचे संयोजन ज्येष्ठ रंगकर्मी भाऊ कार्ले यांनी केले होते. परीक्षक म्हणून अजय यादव आणि मंगेश डोंगरे यांनी काम पाहिले. सुरुवातीला परीक्षकांच्या हस्ते श्री गणरायाला श्रीफळ अर्पण करून स्पर्धेची सुरुवात झाली. संध्याकाळी सहा वाजता स्नेहवर्धिनी महिला मंडळ यांचा नाट्यनृत्य कलाविष्कार रंगला.
दरम्यान, गुरुवार दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता बुद्धिबळ स्पर्धा पार पडणार असून दुपारी २ वाजता महिलांसाठी खास रानभाज्यांचे पदार्थ या विषयावर पाककला स्पर्धा होईल. सायंकाळी ६ वाजता कात्यायनी महिला मंडळ सादर करणार असलेला जागर शक्तीचा हा कार्यक्रम रंगणार असून निवेदन शिला केतकर करतील.
शुक्रवारी सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी साडेपाच वाजता गणेश गौरव पुरस्कार व विविध स्पर्धांच्या विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ होईल. रात्री ९ वाजता संगीत भजन सहेली महिला ग्रुप कलाविष्कार सादर करणार आहे. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता महिलांची सामूहिक आवर्तने, सकाळी ११ वाजता अथर्वशीर्ष पठण, तसेच सायंकाळी ५ वाजता श्रींची विसर्जन मिरवणूक काढण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल यांनी दिली.