
चिपळूण : रोटरी क्लब चिपळूणने सामाजिक बांधिलकीतून आणि सौंदर्यदृष्टी जपत चिपळूण शहरासाठी दोन भव्य कारंज्यांची उभारणी करून शहराच्या सौंदर्यात व प्रतिष्ठेत लक्षणीय भर घातली आहे. हे दोन्ही कारंजे सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आले असून, स्थानिक नागरिकांसाठी हे एक मनोहारी आकर्षण ठरत आहेत. रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. अविनाश पालशेतकर यांच्या नेतृत्वाखाली, क्लबच्या सदस्यांनी आर्थिक व तांत्रिक सहकार्य देत या प्रकल्पाचे यशस्वी नियोजन व अंमलबजावणी केली. या उपक्रमासाठी चिपळूण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. विशाल भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले.
उद्घाटनप्रसंगी रोटे. डॉ. लेनी डिकोस्टा (District Governor 2026-27), रोटे. अजय मेनन (Deputy DRFC & DGSC), रोटे. अभिजीत वालके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रकल्पाचे आयोजन प्रोजेक्ट चेअरमन वैभव रेडीज व प्रसाद सागवेकर यांनी समर्थपणे पार पाडले. चिंचनाका येथे उभारण्यात आलेल्या “I Love Chiplun” या सौंदर्यस्थळी हे एक कारंजे अपरांत डेव्हलपर्स आणि साऊंड ऑफ म्युझिकचे मालक शैलेश टाकळे यांच्या सहकार्याने उभारले गेले.
रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे शहरवासीयांनी व विविध मान्यवरांनी खुले दिलाने स्वागत केले. “शहराच्या सौंदर्यात भर घालणे आणि नागरिकांना शांततेचा अनुभव देणे, हाच आमचा उद्देश होता,” असे अध्यक्ष रोटे. अविनाश पालशेतकर यांनी सांगितले. पुढील काळात आणखी अशा नागरी सौंदर्यवर्धन प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाला श्रीराम भाऊ खरे, सीए विवेक रेळेकर सर, शैलेंद्र सावंत, मंगेश माटे, प्रशांत देवळेकर, दिनकर पवार, नितीन देवळेकर यांच्यासह अनेक रोटेरियन्स उपस्थित होते.