
चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण येथील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे. यंदा एकूण नऊ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
इयत्ता ८ वीतील वरद महेश बेडेकर याने शहरी सर्वसाधारण यादीत ५ वा क्रमांक मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर वेदांत सुनील गुरसळे (२५ वा क्रमांक), सुश्रुत ऋषिकेश महाजन (२८ वा), प्रणाली संतोष पवार (४३ वा), वेदांग विवेक रानडे (६३ वा), आणि अथर्व मिलिंद विखारे (८१ वा) यांनी यादीत उल्लेखनीय कामगिरी बजावली. इयत्ता ५ वीतील स्पृहा उज्वल कलवारी हिला ३९ वा क्रमांक, रुद्र शेखर मेहेंदळे याला १११ वा क्रमांक, तर नील मकरंद रानडे याला ११५ वा क्रमांक प्राप्त झाला. या यशाबद्दल मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध, उपमुख्याध्यापक संजय बनसोडे, पर्यवेक्षिका सौ. रेवती कारदगे तसेच परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या सर्व संचालक मंडळाने यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे पाठबळ यामुळेच हे घवघवीत यश शक्य झाल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले. शिष्यवृत्ती परीक्षेतील हे यश नव्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.