
चिपळूण : गेली दोन वर्षे पुलाजवळ गणपती विसर्जन करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे यंदा देखील जर प्रशासनाने योग्य ती व्यवस्था केली नाही, तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी दिला आहे. बहादूरशेख आणि कळंबस्तेजवळील जुने दोन पुल तोडण्यात आल्यामुळे नव्याने बांधलेल्या पुलाजवळ जाण्यासाठी कोणताही रस्ता उपलब्ध नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. याठिकाणी ओझरवाडी, मवतवाडी, मोकंबवाडी, गांधी नगर, कळंबस्ते, येशील आदी परिसरातील हजारो नागरिक गणेश विसर्जनासाठी येत असतात. या भागात विसर्जनासाठी योग्य ठिकाण निश्चित करून विसर्जन घाट बांधण्याची मागणी गेल्या दोन महिन्यांपूर्वीच प्रशासनाकडे लेखी स्वरूपात करण्यात आली होती. मात्र अद्याप कोणत्याही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी करून नियोजन किंवा उपाययोजना केलेली नाही, असा आरोपही त्यांनी केला.
जर विसर्जन घाटाच्या बांधकामास सुरुवात झाली नाही, तर आम्ही सर्व पक्षीय आंदोलन छेडू," असा स्पष्ट इशाराही मुकादम यांनी दिला आहे. त्याबाबतचा लेखी पत्रव्यवहार त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग विभाग, पोलीस प्रशासन, उपविभागीय अधिकारी आणि चिपळूणचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवला आहे.