राज्यातील पहिलं इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटर सुरू

पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण | चिपळूण नगर परिषदेचा ऐतिहासिक उपक्रम
Edited by: मनोज पवार
Published on: July 05, 2025 17:15 PM
views 35  views

चिपळूण : “चिपळूण नगर परिषदेने स्वयंचलित इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सेंटर सुरू करून पर्यावरण रक्षणाच्या दिशेने उल्लेखनीय पाऊल उचलले आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी ही महाराष्ट्रातील पहिली नगर परिषद ठरली असून, ही संकल्पना इतर ठिकाणीही राबवण्यासारखी आहे. चिपळूणचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या धाडसी पावलाची प्रेरणा घेऊन आता मी रत्नागिरीतही असे चार्जिंग सेंटर सुरू करीत आहे,” असे गौरवोद्गार राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी काढले.

इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र शेजारी उभारण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या स्वयंचलित चार्जिंग सेंटरचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी सकाळी पार पडले. ‘माझे वसुंधरा’ अभियानांतर्गत मिळालेल्या पारितोषिकाच्या निधीतून सुमारे ९ लाख रुपये खर्च करून ही सुविधा नगर परिषदेने विकसित केली आहे. चार्जिंग सेंटरमुळे शहरातील इलेक्ट्रिक दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या उद्घाटनप्रसंगी आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे मार्गदर्शक प्रकाश देशपांडे, माजी आमदार सदानंद चव्हाण, रत्नागिरी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, माजी नगरसेवक परिमल भोसले, नगरसेविका स्वाती दांडेकर, तहसीलदार प्रवीण लोकरे, डीवायएसपी राजेंद्रकुमार राजमाने, मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, नगरसेवक वासुदेव मेस्त्री, नगरसेवक निहार कोवळे, नगरसेविका अदिती देशपांडे, नगरसेविका रिहाना बिजले, आरोग्य विभागाचे वैभव निवाते, उद्यान विभागाचे बापू साडविलकर, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे, शहर प्रमुख सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमातच हनुमान व्यायाम शाळेमध्ये जिल्हा नियोजन निधीतून १४ प्रकारचे आधुनिक व्यायाम साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असून, चिपळूणकरांना आरोग्यदृष्ट्या मोठा फायदा होणार आहे.

चिपळूण नगर परिषदेच्या या पर्यावरणपूरक व आरोग्यवर्धक उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या लोकोपयोगी योजनांमुळे चिपळूणचे नाव विकासदृष्ट्या राज्यात पुढे गेले असून, अशा प्रयत्नांमुळेच 'ग्रीन चिपळूण' साकार होत आहे.