चिपळूण ते पंढरपूर सायकलवारीचे सलग तिसरे यशस्वी वर्ष

Edited by: मनोज पवार
Published on: July 01, 2025 19:14 PM
views 125  views

चिपळूण : चिपळूण सायकलिंग क्लबच्या २४ सदस्यांनी सलग तिसऱ्या वर्षी चिपळूण ते पंढरपूर ही सायकलवारी यशस्वीरित्या पूर्ण करून एक अस्मरणीय आणि प्रेरणादायी कामगिरी बजावली. शेकडो किलोमीटरचा हा प्रवास केवळ शारीरिक क्षमतेची कसोटी नव्हता, तर श्रद्धा, जिद्द आणि संघभावनेचा अद्वितीय संगम ठरला.

या वर्षीच्या वारीस आयोजक प्रसादजी अलेकर व विक्रांत अलेकर यांच्या घरापासून सुरुवात झाली. विशेष म्हणजे, प्रसादजी अलेकर यांच्या मातोश्रींनी सर्व वारकऱ्यांचे औक्षण करून वारीची मंगल सुरुवात केली. शिवसृष्टी येथे पहिला थांबा घेऊन सायकलरिंगण करण्यात आले. त्यानंतर पृथ्वी पाटील यांच्या शिवगर्जनेने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने वारीला खऱ्या अर्थाने गती मिळाली.

वारीचा पहिला दिवस चिपळूण ते विटा असा १४० किलोमीटरचा होता. वाटेत उन्हाचा तडाखा, चढ-उतार, थकवा आणि तांत्रिक अडचणी असूनही सर्व सदस्यांनी एकत्रितपणे हा प्रवास पार पाडला. रात्री विटा येथील पंकज हॉटेलमध्ये त्यांनी विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी विटा ते पंढरपूर असा ११६ किलोमीटरचा प्रवास करत ते विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले.

या वारीत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ऊन, वारा, पाऊस, कुंभार्ली घाटातील खराब रस्ते, वेळोवेळी होणारी सायकल्सची पंक्चरिंग या सर्व अडथळ्यांवर मात करत वारकरी ज्ञानोबा-तुकारामच्या गजरात पंढरपुरात पोहोचले. विठ्ठलाच्या चरणी वंदन करत सर्व सदस्य एकत्र ‘भाऊ’ झाले. ही वारी केवळ एक सायकलप्रवास नव्हता, तर तो भक्ती, निष्ठा आणि चिकाटीचा प्रवास ठरला.

आयोजक आणि क्लबचे सहसचिव प्रसाद अलेकर, अध्यक्ष विक्रांत अलेकर, उपाध्यक्ष प्रशांत दाभोळकर, मनोज भाटवडेकर, कार्यकारणी सदस्य योगेश ओसवाल, स्वप्नील गायकवाड, अमित पेडणेकर, मनोज नितोरे, डॉ. सचिन खेडेकर, चैतन्य गांगण, संदीप राणे, शौरी राणे, अंकुश जंगम, राघव खर्चे, पृथ्वी पाटील, अजित जोशी, श्रीकांत जोशी, हेमंत भोसले, अथर्व भोसले, संजयकुमार कदम, राजेंद्र नाचरे, सुयोग शिंदे, सुयोग पटवर्धन, बंटी सावंत – या २४ सायकलिस्टांनी या वारीत सक्रिय सहभाग घेतला.