
चिपळूण : महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट, चिपळूण शाखेतर्फे रविवार, दि. २९ जून रोजी सकाळी १० वाजता लक्ष्मीबाई माटे हॉल, चिपळूण येथे गवळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात १०वी, १२वीमध्ये ६५ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणारे विद्यार्थी, पदवीधर तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेली व्यक्तिमत्त्वे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी ट्रस्टतर्फे दरवर्षी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
कार्यक्रमात पुण्यातील ओझर्डे इन्स्टिट्यूटचे प्राचार्य भूषण ओझर्डे सर हे UPSC, MPSC आणि विविध स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच प्रा. प्रमोद केसरकर आणि प्रा. चेतन खांडेकर हे राजापूर येथील नवोदय विद्यालयात मिळणाऱ्या सरकारमान्य मोफत शिक्षणाच्या संधींबाबत पालक व विद्यार्थ्यांना माहिती देतील.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व पालकांनी अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन विश्वस्त नितीन (आबूशेठ) ठसाळे, कार्याध्यक्ष मनोजशेठ भोजने तसेच ट्रस्टचे सर्व समिती सदस्य यांनी केले आहे. हा कार्यक्रम समाजातील नव्या पिढीला प्रेरणा देणारा, करिअरविषयी जागरूकता निर्माण करणारा आणि सकारात्मक ऊर्जा देणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.